दत्ता पाटील
म्हाकवेः सोनगे ता.कागल गावाला सौंदर्याने नटलेल्या रामलिंग डोंगराच्या वनसंपदेचे फार मोठे वैभव लाभले आहे.परंतु, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथिल मुरूम व दगड अवैधपणे मोठ्या प्रमाणात उचलला जात आहे. त्यामुळे येथील गर्द झाडीच्या अस्तित्वावरही कुराड येत आहे. आणखी काही दिवस याकडे दुर्लक्ष झालेच तर अख्खा डोंगरच चोरीला जाईल, अशी भीती ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.
गावच्या दक्षिण बाजूला हा डोंगर आहे.येथे गतवर्षी निसर्ग मित्रमंडळाने वृक्षारोपणही मोठ्या प्रमाणावर केले होते. मात्र,ही वृक्ष लागवड पायदळी तुटवून शेकडो ट्राॅली मुरुम उचलला आहे.काही जण हा व्यवसाय म्हणूनच करत आहेत. प्रशासनाची नजर चुकवून रात्री-अपरात्री हा उद्योग केला जात आहे. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार तक्रार करूनही प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारलेला नाही. त्यामुळे आता खुलेआम मुरुमाची उचल केली जात आहे.
कोट....
नूतन सरपंच, सदस्य, ग्रामसेवक तसेच, यापूर्वीच्या पंचकमिटीकडे याबाबत विचारणा केली. मात्र,याबाबत कोणीही दखल न घेता कानावर हात ठेवत सर्वानीच हात वर केल्याचे अमर पाटील यांनी लोकमतला सांगितले.
‘गेल्या अनेक वर्षापासून डोंगरावरील वृक्षसंपदेसह गौणखनिजाची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. संबंधितावर कारवाईच होत नसल्यामुळे बिनधोकपणे ही चोरी सुरू आहे. त्यामुळे वरिष्ठांनी लक्ष दिले तर या डोंगराचे अस्तित्व अबाधित राहणार आहे.
-अमर पाटील
शिवकालीन शस्त्रास्त्रे व नाणी संग्रहकार
कँप्शन ०४ सोनगे
सोनगे येथील मुरूम मोठ्या प्रमाणावर उचलल्यामुळे भक्कास दिसणारा रामलिंगचा डोंगर
छाया-रोहित लोहार, सोनेगे