कोल्हापूर : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्यांचा लिलाव करण्याचा निर्णय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत शुक्रवारी घेण्यात आला. अध्यक्षस्थानी बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ होते. कारखान्याचे माजी अध्यक्ष नरसिंग पाटील यांच्याशी चर्चा करून येत्या तीन-चार दिवसांत विक्रीची निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे. ‘दौलत’ कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासाठी जिल्हा बँकेने आतापर्यंत पाचवेळा निविदा मागविल्या होत्या पण कोणाचाही प्रतिसाद न मिळाल्याने कारखान्याची विक्रीच करावी लागणार होती पण विक्री न करता भाडेतत्त्वावरच चालविण्यास द्यावा, अशी मागणी नरसिंग पाटील यांच्यासह शेतकऱ्यांची होती. कारखान्यावर विविध वित्तीय संस्थांचे तब्बल ३५० कोटींचे कर्ज आहे. हा कर्जाचा डोंगर पाहता एवढी रक्कम उपलब्ध करणे आवाक्याबाहेरच आहे तरीही जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने ३१ जुलैपर्यंत पैसे भरण्याची मुदत दिली होती. या वेळेत कर्जाची रक्कम भरता न आल्याने पुन्हा एक महिन्याची मुदत नरसिंग पाटील यांनी बँकेकडे मागितली होती. एकतर कारखाना गेले चार वर्षे बंद आहे, कारखाना जरी जिल्हा बँकेच्या ताब्यात असला तरी काही मशिनरीची चोरी झालेली आहे, तर काही गंजलेली आहे. त्यामुळे भाडेतत्त्वावर चालविण्यास घेण्यास कोणी पुढे येत नाही. कारखान्याकडील थकबाकी वसूल झाल्याशिवाय बँक सावरू शकत नाही. त्यामुळे बँकेच्या शुक्रवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत यावर चर्चा होऊन कारखाना विक्रीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. नरसिंग पाटील यांच्याशी चर्चा करून येत्या तीन-चार दिवसांत विक्रीची निविदा काढण्यात येणार असून निविदेचे सर्वाधिक अध्यक्ष हसन मुश्रीफ यांना देण्यात आले. उपाध्यक्ष अप्पी पाटील, संचालक के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, भैया माने, अशोक चराटी, उदयानी साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)कारखाना चार वर्षे बंद असल्याने शेतकरी, कर्मचाऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. तेथील शेतकरी व ज्येष्ठ नेते नरसिंग पाटील यांच्या भावनेचा विचार करून कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा प्रयत्न केला. पाचवेळा निविदा काढूनही प्रतिसाद मिळत नसल्याने बॅँकेला विक्रीचे पाऊल उचलावे लागत आहे. हे पैसे वसूल झाले नाहीतर बॅँकेचा परवाना धोक्यात येणार आहे.- आमदार हसन मुश्रीफ(अध्यक्ष, जिल्हा बॅँक) आतापर्यंत कारखान्यांचे तीनवेळा मूल्यांकन झाले आहे. त्यामध्ये ‘नाबार्ड’च्या मूल्यांकनानुसार सर्व मालमत्तेचे २२० कोटी मूल्यांकन करण्यात आले आहे. तीच विक्रीमध्ये किमान किंमत (अपसेट प्राईज) धरली जाणार आहे.
‘दौलत’चा अखेर बाजारच
By admin | Updated: August 1, 2015 00:55 IST