लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : गेल्या वर्षीच्या महापुरातील उर्वरित कर्जमाफीचे पैसे मंगळवारी बँकेत जमा झाले. जिल्ह्यातील ५७५९ शेतकऱ्यांना १२ कोटी ८१ लाखांची कर्जमाफी मिळणार असून, दोन दिवसांत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग होणार आहेत. महिन्यापूर्वी जिल्हा उपनिबंधकांच्या खात्यावर पैसे आले होते, मात्र निवडणूक आचारसंहितेत पैसे थांबले होते. आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख दोन हजार शेतकऱ्यांना ३०६.७९ कोटी कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.
मागील वर्षी जुलै, ऑगस्ट महिन्यांत आलेल्या महापूर व अतिवृष्टीत जिल्ह्यातील ७४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय तत्कालीन महायुतीच्या सरकारने घेतला होता. नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर त्याची अंमलबजवणी होऊन ९६ हजार ६६३ शेतकऱ्यांना २९४ कोटी देण्यात आले. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे सुमारे दहा हजार शेतकरी वंचित राहिले होते. त्यांच्या तक्रारीनंतर फेरतपासणी करून त्यातील ६९८४ शेतकरी पात्र ठरले होते. ही यादी मंजुरीसाठी वरिष्ठ पातळीवर पाठवली होती. मात्र, लॉकडाऊनमुळे कर्जमाफीचे पैसे देता आले नव्हते. पावसाळी अधिवेशनात पैसे देण्यास मंजुरी देण्यात आल्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पैसे जिल्हा उपनिबंधकांच्या खात्यावर वर्ग झाले. तेथून पुढची प्रक्रिया सुरू होईपर्यंत पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता लागल्याने पैसे वाटप करता आले नाही.
निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर तातडीने जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी शेतकरीनिहाय यादी व पैसे जिल्हा बँक व राष्ट्रीयीकृत बँकांकडे वर्ग केले. बँकांच्या पातळीवर त्याचा जमा-खर्च होऊन दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या हातात पैसे मिळणार आहेत. वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर कर्जमाफीचा लाभ मिळाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
महापुरातील कर्जमाफीचा असा झाला लाभ -
बँक शेतकरी कर्जमाफीची रक्कम
जिल्हा बँक ९१,८६० २६६.६५ कोटी
इतर बँका १०,५७२ ४०.१४ कोटी
७८४ शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा प्रतीक्षा
तांत्रिक कारणामुळे कर्जमाफीऐवजी नुकसानभरपाईचा लाभ मिळालेल्या शेतकरी हे फेरतपासणीत कर्जमाफीसाठी पात्र ठरले. त्यांच्याकडून भरपाईचे पैसे वसूल करून त्यांना कर्जमाफीचा लाभ द्यावा का? याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला आहे. जिल्ह्यात असे ७८४ शेतकरी आहेत.
कोट-
महापुरातील उर्वरित कर्जमाफीसाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या प्रयत्नातून पैसे उपलब्ध झाले आहेत. बँकांकडे पैसे वर्ग केले असून, दोन दिवसांत संबंधित शेतकऱ्यांना पैसे मिळतील.
- अमर शिंदे (जिल्हा उपनिबंधक, कोल्हापूर)
- राजाराम लाेंढे