कोल्हापूर : गणेशोत्सव म्हटले की, दहा दिवस आनंदोत्सव असतो. या दहा दिवसांत अनेक विधायक कामांना सुरुवातही केली जाते. समाजात आदर्श निर्माण होतील अशीच कामे केली जातात. त्याचबरोबर आपल्या ज्ञानात भर घालणारी माहितीही याच दिवसांत विविध देखाव्यांतून पाहायला मिळते. अशाच वेगळ्या वाटेवरच्या मंडळांविषयी थोडक्यात माहिती. ‘जिद्द’चा आदर्श सर्वांना घेण्यासारखाराजारामपुरी आठवी गल्ली येथील या मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही धार्मिक कार्यक्रमांबरोबर काही दिवसांपूर्वी संभाजीनगर येथे अज्ञातांनी कोंडाळ्यात सोडून गेलेल्या चिमुकलीस शहरातील पाच डॉक्टरांनी दत्तक घेतले. या डॉक्टरांचा सन्मान या संघटनेकडून केला जाणार आहे. याशिवाय या मुलीसाठी बँकेत रोख रक्कम ठेव स्वरूपात ठेवली आहे. या ठेवीच्या व्याजातून तिच्या दैनंदिन गरजा भागवता येतील. अशा प्रकारे आदर्श मंडळ म्हणून यंदा त्यांनी कार्य केले आहे. हाच कित्ता अनेक मंडळांनीही गिरवला तर डॉल्बी, बेंजो या खर्चातून अनेक सामाजिक संस्थांना मदत होईल; तसेच प्रतिकूल परिस्थितीत कला, क्रीडा, साहित्य, औद्योगिक, सामाजिक अशा अनेक क्षेत्रांत यश संपादन करणाऱ्या व्यक्तींचा ‘जिद्द पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येणार आहे. या मंडळाचे काम अनुप पाटील, अनिल संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष ओंकार पणदे, उपाध्यक्ष गणेश चौगले, सचिव ओंकार वझे, सूरज पाटील हे करीत आहेत. तांत्रिक देखाव्यांतून मनोरंजन करणारे ‘धिंग्रा’ तरुण मंडळशिवाजी उद्यमनगर येथील देशभक्त मदनलाल धिंग्रा तरुण मंडळाने यंदाही तांत्रिक देखाव्यांची परंपरा कायम ठेवली आहे. रोबोट, उडणारी माशी, अॅनाकोंडा, राक्षस, भीम, आदी तांत्रिक देखावे गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ सादर केले जात आहेत. मंडळाने गणेशभक्तांना जगभरात गाजलेल्या चित्रपटांतील प्रसिद्ध होणाऱ्या गोष्टी हुबेहूब साकारून मनोरंजन अधिक ज्ञानात भर घातली आहे. या तांत्रिक देखाव्यांसाठी गेली वीस वर्षांहून अधिक काळ संतोष पोतदार, मनू पोतदार, समीर मुजावर, फारुख मुजावर, संजय गायकवाड, सतीश भोसले, उदय भोसले, सुनील पिसाळ, आदी कार्यरत आहेत. सजीव व तांत्रिक देखाव्याद्वारे प्रबोधन साधणारे ‘प्रिन्स क्लब’खासबाग येथील प्रिन्स क्लबने १९७७ पासून आजपर्यंत प्रबोधनात्मक व सत्यघटनेवर आधारित देखावे सादर केले आहेत. त्यामध्ये स्वराज्याची प्रतिज्ञा, दानशूर कर्ण, बिंदू चौक जेलमधील भ्रष्टाचार, कोल्हापुरात महादेव मंदिरात दारू अड्डा, राजकीय नेते, गुंड व पोलीस यांची पार्टी, सीताहरण, व्यर्थ न हो बलिदान, क्षणाची मजा आदी सजीव देखावे व स्कूटर, जीप, हेलिकॉप्टर चालविणारा गणेश, चालता-बोलता गणराज, गणपती बाप्पा पळून गेले व यंदा व्यसनरूपी राक्षस केला आहे. या मंडळाचे काम अशोक पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप काटकर, जयदेव बोरपाळकर, किरण भोसले, संदेश पोलादे, आदी करीत आहेत. परदेशातील मूर्तीसाठी प्रसिद्ध असणारे ‘जय पद्मावती ’मंगळवार पेठ येथील पद्मावती मंदिराशेजारी असणाऱ्या जय पद्मावती तरुण मंडळाने यंदाही परदेशातील गणेशमूर्ती साकारून वेगळी गणेशमूर्ती साकारण्याची आपली परंपरा यंदाही जपली आहे. या मंडळामुळे कोल्हापुरातील गणेशभक्तांना भारताबाहेरही गणेशाचे पूजन करणारी मंडळी असल्याची माहिती प्रथमच अनेक गणेशमूर्ती साकारून दिली. १९८० मध्ये स्थापन झालेल्या या मंडळाने १९८९ पासून प्रथम इंडोनेशिया येथील प्राचीन मूर्ती साकारली. त्यानंतर इंडोनेशियामधील सात, नेपाळ, इराण, केरळ, ओरिसा, हिमालय, थायलंड, आदी ठिकाणच्या प्राचीन मूर्ती साकारल्या. यंदा हीच परंपरा कायम राखत थायलंड येथील पंचमुखी गायत्री मातारूपी गणेशमूर्ती साकारली आहे.
कोल्हापूर-- वेगळ्या वाटेवरील मंडळे
By admin | Updated: September 5, 2014 23:59 IST