आजरा : आजरा साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक विष्णुपंत केसरकर यांची, तर उपाध्यक्षपदी मारुती घोरपडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्ष अशोकअण्णा चराटी व उपाध्यक्ष सुधीर देसाई यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला. गेल्या पंधरवडाभर अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडल्या. ज्येष्ठत्व आणि आगामी विधानसभा निवडणुका विचारात घेऊन जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ, आमदार के. पी. पाटील व आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी दोन्ही नूतन पदाधिकाऱ्यांची नावे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंद देसाई यांच्याकडे बंद लिफाफ्यातून दिली. बैठकीच्यावेळी देसाई यांनी या लिफाफ्यातील नावे जाहीर केली. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा अशोक चराटी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी चराटी म्हणाले, बऱ्याच परिश्रमातून संचालकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे कारखाना सुस्थितीत आला आहे. कारखान्याचे सभासद व संचालकांनी सोपविलेली जबाबदारी आपण पार पाडली आहे. नूतन अध्यक्ष विष्णुपंत केसरकर म्हणाले, गेली २० वर्षे कारखान्याचा संचालक म्हणून केलेल्या कामाचे फळ आपणाला मिळाले. सर्वांना विश्वासात घेऊन काम केले जाईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. उपाध्यक्ष मारुती घोरपडे म्हणाले, अडचणीच्या काळात सभासदांनी दाखविलेल्या विश्वासास पात्र राहून संचालक मंडळ काम करेल. उपाध्यक्ष म्हणून कारखान्याच्या कारभाराला कदापिही गालबोट लागू दिले जाणार नाही. यावेळी सुधीर देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. या बिनविरोध निवडीनंतर केसरकर व घोरपडे यांच्या समर्थकांनी कारखाना कार्यस्थळावर जोरदार आतषबाजी करीत गुलालाची उधळण केली. यावेळी उदय पवार, अबुताहेर तकिलदार, वसंतराव धुरे, सभापती अनिता नाईक, उपसभापती तुळशीराम कांबळे, दिगंबर देसाई यांच्यासह संचालक, कार्यकारी संचालक पी. एल. हरेर, सचिव व्यंकटेश ज्योती उपस्थित होते. (प्रतिनिधी)
'आजऱ्या'च्या अध्यक्षपदी केसरकर
By admin | Updated: July 8, 2014 01:06 IST