आंबा : ठिकाण वाघझऱ्या परिसरातील भिवतळीचे जंगल. पंधरा तरुणांचा ग्रुप हातात फावडे, कुदळ घेऊन जंगल कपारीतील पाण्याचा जिंवत झरा मोकळा करीत होते. दगड-गोटे, पाला अन् मातीने मुजलेले पाणवठे मोकळे करून पाणी वाहते करीत होते. या तरुणांनी दोन दिवसांत सहा पाणवठे पुनर्जीवित केले. निमित्य होते मोनेरा फौंडेशनच्या ‘चला जपुया जंगली पाणवठे’, या उपक्रमाचे. मोनेराच्या निसर्गप्रेमींनी परीक्षेचा शीण थेट जंगलातील पाणवठे पुनर्जीवित करण्यासाठी घालवला. जंगली प्राणी पाण्यासाठी मानवी वस्ती, शेतीत न येता जंगलातील पाणवठ्यांवरच स्थिर राहावेत, तसेच माणूस व प्राण्यांतील संघर्षाची तीव्रता कमी व्हावी म्हणून हा या निसर्गप्रेमींचा विधायक उपक्रम गेली दोन वर्षे चालू आहे. पर्यावरण अभ्यासक प्रमोद माळी यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्य बेर्डे, प्रा. सुनील पाटील, वैभव पाटील, रेश्मा पाटील, रोहित पाटील, स्वप्निल सणगर, धनंजय अवसरे, स्वरूप अवसरे, हेंमत देशमुख, ओंकार चव्हाण, डॉ. योगेश फोंडे, संदीप वडर, विनोद ढोके, प्रथमेश शेळके, आदी मोनेरा फौंडेशनच्या सदस्यांनी चाळणवाडी येथील बाध्याचे पाणी व जखिणीचे पाणी, वाघझऱ्याजवळील पाथरझरा, माकडीणीचे तळे, आंबाघाटातील गायकुंड, आदी पाणवठे, तर रानडुकरांना उन्हात लोळण घेण्यासाठी मढबाथ तयार केले आहेत. येथे जंगली प्राणी, पक्षी चिखलात लोळून व मनसोक्त पाणी पिऊन उन्हाच्या झळा कमी करतात. याबाबत प्रमोद माळी म्हणाले, विविध टप्प्यांतील पाणवठ्यावर विविध प्रकारच्या पक्षी व प्राण्यांची तहान भागते. यांचा सर्व्हे करून त्यांची पुनरनिर्मिती हाती घेतली. यामुळे आता सर्व झरे नियमित पाझरू लागले असून, पाण्याची साठवण झाली आहे. धोपेश्वर परिसरातील बॉक्साईट उत्खननामुळे आंबा-विशाळगड जंगलाकडे सरकलेल्या पशु-पक्षांची तहाण या पाणवठ्यांवर भागत आहे. जंगल व्यवस्थापनासाठी स्थानिक वनसमित्या व पर्यावरणप्रेमी संघटनांची मदत मोलाची ठरत आहे. गरज प्राण्यांच्या गरजा जाणण्याचीमोनेरा फौंडेशन, सह्याद्री लोकविकास संस्था व वसुंधरा नेचर क्लब यांनी पाणवठे संवर्धनाचा प्रस्ताव कोल्हापूर वन विभागाचे उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांना मार्च महिन्यात सादर केला. प्राण्यांना जंगलातच पाणी व अन्न मिळाले, तर ते शेती व मानवी वस्तीकडे वळणार नाहीत. परिणामी माणूस व जंगली प्राणी असा संघर्ष नाहीसा होईल. त्यासाठी या प्रस्तावाबाबत वनविभागाने लक्ष वेधण्याची गरज आहे. जंगलतोड, वणवे व बॉक्साईटच्या उत्खननामुळे चारा व पाणी कमी झाल्याने गवे, डुक्कर कळपाने शेतीकडे मोर्चा वळवित आहेत.त्यामुळे जंगलालगतची शेती थांबली आहे. उन्हाळ्यातील पाणीटंचाईमुळे प्राण्याचे हाल होत आहेत. प्राणीगणनेपुढे जाऊन त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणारे ठोस उपक्रम वनविभागाने हाती घेण्याची गरज आहे
चला जपूया जंगल, पाणवठे, पक्षी, प्राणी...
By admin | Updated: May 8, 2015 00:15 IST