जयसिंगपूर : जीपीएस प्रणालीद्वारे झाडांचे सर्वेक्षण करण्याच्या प्रकल्पानंतर आता तेराव्या वित्त आयोगातून शहरात एलईडी पथदीप हा प्रकल्प नगरपालिका राबविणार आहे. एक कोटी ९७ लाख रुपये खर्चाचा हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, एलईडी पथदिवे बसविण्याबाबतची निविदा नुकतीच निघाली आहे. या प्रकल्पामुळे विजेच्या बचतीबरोबर पालिकेचा आर्थिक भार कमी होणार आहे.आतापर्यंत पालिकेने शासनाच्या विविध योजनांतून विकासात्मक प्रकल्प राबविले आहेत. जीपीएस प्रणालीअंतर्गत झाडांचे सर्वेक्षण करणारी पश्चिम महाराष्ट्रातील जयसिंगपूर नगरपालिका दुसरी ठरली आहे. या प्रकल्पानंतर तेराव्या वित्त आयोग योजनेअंतर्गत शहरातील जुन्या पोलचे दिवे काढून नवीन एलईडी पथदिवे बसविण्याचा प्रकल्प पालिकेने हाती घेतला आहे. सध्या शहरात स्ट्रीट लाईटमुळे सुमारे दोन हजार युनिट वीज खर्च होते. त्यापोटी महिन्याला सुमारे तीन लाख रुपये देखभाल, दुरुस्ती व वीज बिलासाठी खर्च होतात. सुरुवातीला एका कंपनीने हा प्रकल्प राबविण्याची सहमती दर्शविली होती. मात्र, पालिकेनेच हा प्रकल्प स्वत: राबविण्याचे धोरण निश्चित केले होते. दरम्यान, एलईडी पथदिवे पुरवठा करणे व बसविणे याबाबतची निविदा नुकतीच पालिकेकडून प्रसिद्ध झाली आहे. हा प्रकल्प राबविण्यात आल्यानंतर पाच ते सहा वर्षांत झालेला हा खर्च वीज बचतीच्या माध्यमातून पालिकेला परत मिळणार आहे. एकूणच एलईडी पथदीप प्रकल्पामुळे वीज बिलाचा आर्थिक ताण कमी होणार असल्याने पालिकेने उचललेले विकासात्मक पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे. (प्रतिनिधी)५0 ते ७५ टक्के विजेची बचत होणारएक कोटी ९७ लाख २७ हजार ३३० रुपये अंदाजित खर्चाची ही निविदा प्रसिद्ध झाली असून, ४ मार्चपर्यंत निविदा सादर करण्याची मुदत ठेवण्यात आली आहे. एलईडी पथदिवे बसविल्यानंतर सुमारे ५० ते ७५ टक्केविजेची बचत होणार असून, हा प्रकल्प पालिकेच्या फायद्याचा आहे. त्यामुळे पालिकेचे वर्षाला ३० ते ३५ लाख रुपये वाचणार आहेत.
जयसिंगपुरात एलईडी पथदिवे प्रकल्प
By admin | Updated: February 23, 2015 00:21 IST