कोल्हापूर : ‘इंडियन नको, भारतीय बनून राहा’, कमी खर्चात शेती उत्पादन टिकविण्याचे तंत्रज्ञान आत्मसात करा, ज्ञान-विज्ञानाला अनुभवांची जोड देऊन शेती विकास साधा, असे आवाहन आज, मंगळवारी येथे कृषी उत्सवात तज्ज्ञांनी केले. भारतीय संस्कृती उत्सवांतर्गत कृषिउत्सवानिमित्त कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी मठाजवळील ६५ एकरांचा कुरण हा परिसर दुसऱ्या दिवशीही आबालवृद्धांच्या गर्दीने फुलला होता.उत्सवस्थळी असलेल्या मुख्य मंडपात सकाळी साडेदहा वाजता पाच हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींचे समूह गायन आणि गोमाता पूजनाने कृषिउत्सवाला प्रारंभ झाला. या उत्सवातील पहिल्या सत्रासाठी कृषिपूरक तंत्रज्ञ ललित मैशेरी, सेंद्रिय शेतीतज्ज्ञ एल. नारायणरेड्डी, जुनागढचे (गुजरात) मुक्तानंद बापूजी प्रमुख उपस्थित होते. अध्यक्षस्थानी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे माजी संचालक डॉ. एस. ए. पाटील अध्यक्षस्थानी होते.ललित मैशेरी म्हणाले, शेतीमाल नाशवंत असल्याने मिळेल त्या किमतीला शेतकरी त्यांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री करतात. त्यात अनेकदा त्यांचे नुकसान होते. ते टाळण्यासाठी कमी खर्चात शेती उत्पादन टिकविण्याचे तंत्रज्ञान विकसित करणे गरजेचे आहे.एल. नारायणरेड्डी म्हणाले, पूर्वी शेती उत्तम, व्यापार मध्यम आणि नोकरी अगम समजण्यात येत होती. मात्र, गेल्या ५० वर्षांपासून नोकरी उत्तम, व्यापार मध्यम व शेती अगम झाली असून ते देशाला अधोगतीकडे नेणारे आहे. शेतीला पैशांतून पाहण्यापेक्षा नवनिर्मिती, समाधान आणि स्वास्थ्याच्यादृष्टीने बघा. त्याद्वारे त्यामध्ये कार्यरत राहा. झटपट उत्पादन मिळविण्याच्या उद्देशाने आपण रासायनिक खतांचा शेती वापर वाढविला आहे. त्यामुळे आपण अमेरिकासारखे इंडियन बनलो आहोत. त्यातून आपले शेतीकडे दुर्लक्ष होत आहे. काही मोजक्याच भारतीयांचे शेतीकडे लक्ष असून ते ‘शेतकरी’ म्हणून तसेच सेंद्रिय शेतीत कार्यरत आहे. भक्कम आरोग्य राहावे यासाठी इंडियन नाही, तर भारतीय बनून रहा.डॉ. पाटील म्हणाले, आपल्या देशाची शेतीसंस्कृती भक्कम आहे. ज्ञान-विज्ञानाला अनुभवांची जोड देऊन शेती विकास साधण्याची सध्या गरज आहे. जमीन न वाढणारी गोष्ट आहे. त्यामुळे उपलब्ध जागेत कृषी संरचना (अॅग्रीक्लचर स्ट्रक्चर) राबवून दुप्पट, तिप्पट उत्पादन घेणे आवश्यक आहे. त्यात केळीच्या बागेत हळद, आल्याचं आंतरपीक घेणे, बांधांवर सागवान लावणे, विविध भाज्या, पिकांचे वेल लावणे आदी प्रयोग करून विविध पद्धतीने उत्पादन वाढविता येईल. यशस्वी शेतीसाठी मातीची ताकद वाढविणे, पाण्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे.या कार्यक्रमात केरळमधील महाविश्व चैतन्य आश्रमनिर्मित भारतीय संस्कृतीची कालदर्शिका (कॅलेंडर) आणि ‘स्वावलंबी शेती’ या पुस्तकाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी व प्रमुख उपस्थितांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. खतांपासून मोठ-मोठ्या अवजारांपर्यंतचे कृषिविषयक प्रदर्शन पाहण्यास देशाच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या शेतकरी, नागरिकांनी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)‘अॅग्रीकल्चर स्ट्रक्चर’ अभ्यासक्रम‘अॅग्रीकल्चर स्ट्रक्चर’ हे बदलत्या परिस्थितीची गरज आहे. ते लक्षात घेऊन सिद्धगिरी मठावर याबाबतचा अभ्यासक्रम सुरू केला जाणार असल्याचे डॉ. एस. ए. पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, या अभ्यासक्रमासह सेंद्रिय शेतीचे धडेदेखील देण्यात येणार आहेत.चव्हाण यांची बैलगाडी ‘अव्वल’शोभायात्रेत सहभागी बैलगाड्यांसाठी आकर्षक सजावट स्पर्धा घेण्यात आली. त्यात कांडगांव (ता. करवीर) येथील सखाराम चव्हाण यांची बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकविला. त्यांना रोख १५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. अन्य विजेते : संदीप मुंडे (आळते, ता. हातकणंगले, द्वितीय क्रमांक), रावसाहेब पाटील (आळते), कृष्णात मनाडे (उचगांव) आणि बाळासाहेब मोरे (कणेरीवाडी, उत्तेजनार्थ).स्ट्रॉबेरीचे चिप्स्, टॉमेटोची पावडर...कमी खर्चात शेती उत्पादन टिकविण्याचे तंत्रज्ञान मुंबईतील ६५ वर्षीय ललित मैशेरी यांनी विकसित केले आहे. विविध पिके आणि शिजविलेले अन्न हे गरम न करता, केमिकल न वापरता सुकविण्याचे तंत्र अवगत केले आहे. त्याद्वारे त्यांनी स्ट्रॉबेरीचे चिप्स्, टॉमेटोची पावडर, ड्राय स्वरूपातील पांढरा कांदा, मेथी, सुंठ, आलं आदींसह घरी शिजविलेले अन्न त्यातील पोषक तत्त्वे आणि मूळ चव, रंग अबाधित ठेवण्याचे काम केले आहे. त्याची माहिती कृषि उत्सवातील प्रथम सत्रात मैशेरी यांनी चित्रफीतीद्वारे दिली. त्यांनी या तंत्राद्वारे बनविलेली पिके, अन्नाला असलेली परदेशातील बाजारपेठेची माहिती दिली. महाराष्ट्रात जमिनीची लूट...उसाच्या माध्यामातून देशात सर्वाधिक प्रमाणात महाराष्ट्रात जमिनीची अधिक लूट केली जात आहे. जमिनीचा पोत कायम राहावा म्हणून काहीच केले जात नाही. नुसते पैशांसाठी शेतीतून हवे तसे उत्पादन न घेता किमान एक एकर जागा असल्यास २५ झाडे लावा, तर चार एकर जमिनीत एक गाय पाळा. असे सेंद्रिय शेतीतज्ज्ञ एल. नारायण रेड्डी यांनी मांडले.
इंडियन नको, भारतीय बनून राहा
By admin | Updated: January 21, 2015 00:30 IST