मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील अनुभवी व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. मोहन आगाशे. मानसशास्त्राचे गाढे अभ्यासक, समुपदेशक म्हणूनही त्यांची ओळख आहे. चित्रपटातून बहुविध भूमिका साकारताना आपल्यातील माणूस आणि समाजाविषयीची बांधिलकीची जपणूक करण्यासाठी डॉ. आगाशे नेहमीच प्राधान्य देत आले आहेत. केवळ अभिनय न करता समुपदेशनाचे कामही त्यांच्याकडून होत आहे. ‘अस्तु’सारखा वेगळा विषय मांडणारा आणि वृध्दांचे भावविश्व उलगडून दाखविणारा चित्रपट त्यांनी निर्माण केला आहे. डॉ. मोहन आगाशे नुकतेच सांगलीत आले होते. मराठी चित्रपट, त्यात होणारे बदल, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून तरूणाईचे प्रश्न यावर डॉ. आगाशे यांच्याशी साधलेला हा थेट संवाद...प्रश्न : मराठी चित्रपटसृष्टीत होत असलेल्या नवनवीन बदलांविषयी तुमचे काय मत आहे?उत्तर : अलीकडे अत्यंत दर्जेदार आणि सकस कथानक असलेले चित्रपट निर्माण होत आहेत. ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. सैराटसारख्या सिनेमाने चांगले कथानक तर दिलेच शिवाय व्यवसायही केला. ही सकारात्मक गोष्ट असली तरी, वितरण व्यवस्था अत्यंत खराब असल्याने समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत चित्रपट पोहोचू शकत नाही. ही खंत कायम आहे. प्रश्न : कमकुवत वितरण व्यवस्थेमागे कोणते कारण असावे?उत्तर : सिनेमा लोकांपर्यंत गेला पाहिजे, या विचाराने काम करणारे लोक कमी झाले आहेत. व्यवसाय आणि धंदा यात फरक आहे. चित्रपट क्षेत्रात धंदा करणाऱ्या लोकांची संख्या वाढल्याने चांगल्या कलाकृती असतानाही त्या लोकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. अर्थपूर्ण सिनेमापेक्षा गल्ला भरू शकतो अशा सिनेमाला प्राधान्य मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील दर्जेदार कलाकृती सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी वितरण व्यवस्था सुधारणे आवश्यक आहे. त्यामुळेच ‘अस्तू’ सिनेमा मी स्वत:च प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रश्न : वेगळा प्रयोग असलेल्या ‘अस्तू’ सिनेमाबद्दल काय सांगाल?उत्तर : आयुष्याची सारी कमाई घालून हा सिनेमा बनवला आहे. चित्रपट निर्माण केल्यानंतर समाजात खरंच संवेदनाक्षम लोक आहेत, याची जाणीव झाली. तब्बल साडेतीन वर्षे दुसऱ्या कोणत्याही चित्रपटात काम न करता या चित्रपटासाठी फिरतोय. आता यावरच न थांबता ‘कासव’ चित्रपटाच्या माध्यमातून वेगळा प्रयोग करतोय. तोही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. प्रश्न : तरूण पिढी आणि वाढत्या आत्महत्यांकडे कोणत्या नजरेने पाहता?उत्तर : सध्या परिस्थितीपुढे शरणागती पत्करण्याची मानसिकता तयार होत आहे, हे घातक आहे. प्रेम आणि मृत्यू या दोन गोष्टी भावनिक अनुभव देतात. विशेषत: म्हातारपणात त्या जास्त जाणवतात. स्वत:च्या अनुभवातूनच प्रत्येकजण शिकत असल्याने सामाजिक भावना प्रबळ होत असतात. नवीन सामाजिक कुटुंबे तयार होत असून, ती नैसर्गिक गरजेतून निर्माण झाली आहेत. आत्महत्येला विविध कारणे असतात. आत्महत्या करणाऱ्यांना मरायचे नसते, मात्र ‘एरर इन जजमेंट’मुळे तसे घडते. यामुळे तरूणाई भरकटल्याची चर्चा वाढत आहे. प्रश्न : सोशल मीडियाकडे आजच्या तरूणाईने कशाप्रकारे पाहावे?उत्तर : फेसबुक, व्हॉटस्-अॅपसारख्या माध्यमांमुळे प्रत्येकजण एकत्र राहूनही भावनिकदृट्या दूर आहेत, दूर चालले आहेत. सोशल मीडियामुळे आजचा समाज आणि विशेषत: तरुणाई फार गुंतून गेल्याने जीवनशैलीच बदलत चालली आहे. प्रत्येकाच्या जीवनातला प्रत्यक्ष संवाद हरपला आहे. हा संवाद पुन्हा नव्याने होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे वाटते. या संवाद माध्यमांचा आज समाजावर विपरित परिणाम होत आहे. अनेक मराठी चित्रपट समाजातील परिस्थितीवर निघत आहेत. त्यातून बरेच काही बोध घेऊन समाजासाठी कार्य करण्याची गरज आहे. - शरद जाधव, सांगली
मराठी चित्रपटांची वितरण व्यवस्था सुधारा
By admin | Updated: February 1, 2017 00:26 IST