अपूर्व उत्साह : डोळ्यांचे पारणे फेडणारा क्षण कोल्हापूर : आपला विजयोत्सव साजरा करण्यासाठी भालदार-चोपदार.. घोडेस्वार अशा शाही लवाजम्यानिशी आलेली करवीर निवासिनी अंबाबाई, तुळजाभवानीची पालखी, ऐतिहासिक मेबॅक कारमधून आलेले कोल्हापूर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, युवराज संभाजीराजे, महाराजकुमार मालोजीराजे, यौवराज यशराजे. आरतीनंतर बंदुकीच्या फैरी झाडून दिलेली सलामी, आकर्षक आतषबाजी आणि हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या कोल्हापूरवासीयांच्या डोळ््यांचे पारणे फेडणारा असा शाही दसरा सोहळा काल, शुक्रवारी संपन्न झाला. अंबाबाई तुळजाभवानीची ईश्वरी सत्ता आणि संस्थान सत्तेच्या संगमाने झालेल्या या शाही सीमोल्लंघन सोहळ््याला ‘सोनं घ्या, सोन्यासारखं राहा’ अशा शुभेच्छा देत नागरिकांनी सोने लुटले. आठ दिवस महिषासुरशी घनघोर युद्ध करून विजय मिळवलेल्या दुर्गेच्या विजयोत्सवाचा परमोच्च क्षण म्हणजे सीमोल्लंघन सोहळा. यानिमित्त करवीर निवासिनी अंबाबाईची रथारूढ पूजा बांधण्यात आली. आपला विजयोत्सव साजरा करण्यासाठी देवी रथात बसून जाते, असा यामागचा अन्वयार्थ आहे. ही पूजा आशुतोष कुलकर्णी, श्रीनिवास जोशी, भैया अष्टेकर यांनी बांधली. कोल्हापूरचा शाही दसरा म्हणजे देशवासीयांचे आकर्षण. संस्थान खालसा झाले असले तरी येथील संस्थानकालीन परंपरा आजही सुरू आहेत, त्यातला महत्त्वाचा उत्सव म्हणजे करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा शारदीय नवरात्रौत्सव. सायंकाळी पाच वाजता अंबाबाईची आणि तुळजाभवानी देवीच्या पालख्या आपल्या लवाजम्यानिशी दसरा चौकाकडे प्रस्थान झाल्या. दरम्यान, श्रीमंत शाहू महाराज, युवराज संभाजीराजे, महाराजकुमार मालोजीराजे, बाळराजे शहाजीराजे, यशस्वीनीराजे, यौवराज यशराजे यांचे मेबॅक कारमधून सोहळास्थळी आगमन झाले. यावेळी महापौर तृप्ती माळवी, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, खासदार धनंजय महाडिक, ऋतुराज इंगळे, रविराज निंबाळकर, संग्रामसिंह चव्हाण, शंतनु यादव, मानसिंग जाधव यांच्यासह मानकरी उपस्थित होते. सोहळास्थळी पोलीस बँडने देवीला मानवंदना दिली. शाहू महाराजांच्या हस्ते देवीची आरती झाल्यानंतर सहा वाजून एकोणीस मिनिटांनी बंदुकीच्या फैरी झाडून या शाही सोहळ््याला सलामी देण्यात आली. त्यानंतर नागरिकांनी सोने लुटले. छत्रपतींनी मेबॅक कारमध्ये उभे राहून कोल्हापूरकरांकडून सोने स्वीकारले. त्यानंतर जुना राजवाड्यात दसऱ्याचा दरबार भरविण्यात आला. अंबाबाईची पालखी आपल्या लवाजम्यानिशी सिद्धार्थनगर, पंचगंगा नदी घाट, पापाची तिकटी, गुजरीमार्गे रात्री मंदिरात परतली. नवरात्रौत्सवाची सांगता अश्विन पौर्णिमेला अंबाबाई मंदिरातील महाप्रसादाने होणार आहे.
शाही सोहळ्यात सीमोल्लंघन
By admin | Updated: October 5, 2014 23:36 IST