जयसिंगपूर : जून २०२० पासून लॉकडाऊन काळातील वीजबिले माफ करावीत याकरिता राज्यभर आंदोलने सुरू आहेत. सरकारनेदेखील बिल माफ करण्याबाबत सकारात्मक विधाने केली होती. परंतु ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्यानंतर थकीत वीजबिलांबाबत ग्राहकांना वीज कनेक्शन कट करण्याच्या नोटिसा देऊन जनतेची फसवणूक केली आहे. जबरदस्तीने वीज कनेक्शन तोडल्यास स्वाभिमानी स्टाइलने उत्तर देऊ, असा इशारा नगरसेवक शैलेश चौगुले यांनी प्रसिद्धपत्रकाद्वारे दिला आहे.
लॉकडाऊन काळात अनेक उद्योग, व्यवसाय बंद असल्याने आर्थिक टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे राज्य सरकारने किमान वीजबिले माफ करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. कोरोना काळामध्ये राज्य सरकारने कोणतीही मोठी मदत न करणे म्हणजे हे महाविकास आघाडीचे अपयश आहे. वीजबिलासंदर्भात जनतेच्या भावना तीव्र असून, जबरदस्तीने वीज कनेक्शन तोडण्याचा प्रयत्न केल्यास अधिकाऱ्यांना स्वाभिमानी स्टाइलने उत्तर देऊ, असा इशाराही चौगुले यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.