इचलकरंजी : येथील सायझिंग-वार्पिंग कामगारांच्या कामबंद आंदोलनाचा गुरुवार हा दहावा दिवस. मालक संघटनेला बोलावून किमान वेतनाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना द्याव्यात, अशा मागण्यांसाठी संघटनेने प्रांत कार्यालयावर गुरुवारी मोर्चा काढला. दरम्यान, याबाबत संयुक्तपणे चर्चा करून तोडगा काढण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी दिले. लालबावटा सायझिंग-वार्पिंग संघटनेने २० जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये शासनाने २९ जानेवारी २०१५ पासून केलेल्या किमान वेतन फेररचनेची अंमलबजावणी करून त्यानुसार कामगारांना किमान वेतन द्यावे, ही प्रमुख मागणी आहे. दरम्यान, या आदेशावर मालक संघटनांनी न्यायालयाकडे दाद मागितली आहे. मात्र, न्यायालयाने याबाबतचा कोणताही स्थगिती आदेश दिलेला नाही. त्यामुळे प्रशासनाने मालक संघटनेला बोलावून घेऊन अंमलबजावणी करण्याच्या सूचना द्याव्यात, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. या प्रश्नाबाबत १ आॅगस्टला मुंबईला जाऊन राज्यपालांनाही निवेदन देण्यात येणार आहे. थोरात चौकापासून निघालेला हा मोर्चा आंबेडकर पुतळा, शिवाजी पुतळा, जनता चौक ते प्रांत कार्यालय असा मार्गस्थ झाला. मोर्चाचे नेतृत्व प्राचार्य ए. बी. पाटील, आनंदराव चव्हाण, सुभाष निकम, सूर्यकांत शेंडे, चंद्रकांत गागरे, आदींनी केले. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने कामगार सहभागी झाले होते. (वार्ताहर)
इचलकरंजीत किमान वेतनासाठी मोर्चा
By admin | Updated: July 31, 2015 01:10 IST