अतुल आंबी : इचलकरंजी, शहराला लाचखोरीची वाळवी लागत असून, गेल्या वर्षभरामध्ये महसूल खाते १, नगरपालिका १ व पोलीस खाते २ असे चारजण लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात सापडले आहेत. या कारवाईनंतर तरी अन्य अधिकारी व कर्मचारी धडा घेणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.गुरुवारी दोन हजार रुपयांची लाच घेताना आझाद गडकरी हा वाहतूक शाखेचा पोलीस कॉन्स्टेबल सापडला. या आधी १ जुलै रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार हरिश्चंद्र बुरटे हाही दोन हजारांची लाच घेताना सापडला होता. साधारण सहा महिन्यांपूर्वी नगरपालिकेतील जलअभियंता आर. वाय. जोशी २५ हजारांची लाच घेताना सापडला, तर एप्रिल २०१३ मध्ये प्रभारी दुय्यम निबंधक व्ही. एस. चव्हाण हा अधिकारी १२०० रुपयांची लाच घेताना सापडला. हे झाले तक्रार दिल्याने अडकलेले मोहरे. मात्र ज्यांच्याविषयी तक्रार होत नाही अशांचे काय? पालिकेतील अभियंता जोशी सापडला तेव्हा संबंधित तक्रारदाराने पालिकेतील टक्केवारीचा सविस्तर भांडाफोडच केला होता. नगराध्यक्षा, मुख्याधिकारी, सभापतींपासून ते साखळीतील सर्व लोकांची टक्केवारीनुसार सविस्तर माहिती दिली होती. या प्रकरणानंतर नागरिक नगरपालिका क्षेत्राबद्दल व तेथील कामकाजाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत होते. त्यानंतर पोलीस खात्यातील लोक सापडल्यानंतर त्यांच्याबद्दलही उलटसुलट चर्चा सुरू होती. काल आझाद सापडल्यानंतर शहरात फेसबुक व व्हॉट्स अॅप या सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात पोलिसांवर टीका सुरू झाली. यामध्ये हा सापडला बरे झाले. माझ्याकडून एवढे पैसे घेतले होते, असे व यापेक्षा विचित्र कमेंटही करण्यात आले आहेत. तसेच रिक्षा, मोटार व वडापच्या थांब्यांवरील कट्ट्यावर गडकरी हा चांगला माणूस होता. त्यापेक्षा मोठे मासे चुकले आणि तो बिचारा सापडला, अशीही चर्चा ऐकावयास मिळाली. शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील हवालदार बुरटे सापडल्यानंतरही पोलीस ठाण्यात ‘नेहमी येणाऱ्या’ नागरिकांतही अशीच चर्चा होती. बुरटे खूप चांगले होते. केवळ दोन हजार रुपयांसाठी ते सापडले. मात्र, १०-१० व २०-२० हजार रुपये घेणाऱ्यांचे काय, ते यातून नामानिराळेच राहिले. कारण त्यांच्याविरोधात तक्रार झालीच नाही. तक्रार होणार तरी कशी? अलीकडील काळात लाचलुचपत विभागाच्या वतीने होणाऱ्या कारवायांमुळे तरी किमान या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धडा घ्यावा व इचलकरंजीला लागलेली लाचखोरीची वाळवी रोखावी, अशी मागणी जनसामान्यांतून होत आहे.‘ओळखीने’ तडजोड करून प्रकरण मिटतेकित्येकजणांचा कधीतरीच एखाद्या कामानिमित्त पोलीस ठाण्याशी संपर्क येतो. तेही एखाद्या अडचणीत सापडल्यावरच. मग त्यांच्याविरोधात तक्रार करून उद्या जायचे कुणाकडे, त्यात कामही अडचणीचे असते. मग ‘आलिया भोगासी असावे सादर’ असे म्हणत होणाऱ्या मागणीत ‘ओळखीने’ तडजोड करायची आणि प्रकरण मिटवायचे, असा प्रकार सर्रास चालतो. मात्र, याबाबत कोणताच पुरावा निर्माण करता येत नाही. त्यामुळे सर्व काही आलबेल चाललेले असते, असे सामाजिक कार्यकर्त्यांचे मत आहे.
इचलकरंजीला लाचखोरीची वाळवी
By admin | Updated: July 27, 2014 23:00 IST