म्हाकवे : आमच्या साहेबांनी आयुष्यभर संघर्षमय जीवन जगून सामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांचे हित जोपासले. कार्यकर्त्याला हत्तीचे बळ देऊन त्याच्या संरक्षणाचीही जबाबदारी घेतली. तसेच, भ्रष्टाचारासह कोणताही डाग त्यांनी लावून घेतला नाही. तशी शिकवणही कार्यकर्त्यांना दिली. अशा थोर नेत्याचा आम्हाला सहवास लाभला हे आमचे भाग्य आहे, असा सर्वांगसुंदर नेता पुन्हा होणे नाही, अशा भावना व्यक्त करताना अनेक कार्यकर्त्यांचा ऊर भरून आला.हमीदवाडा (ता. कागल) येथील कारखाना कार्यस्थळावर झालेली शोकसभा म्हणजे माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या ४० वर्षांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आदी सर्वच क्षेत्रांतील त्यांच्या वाटचालीला उजाळा देणारी ठरली. मंडलिकांच्या प्रतिमेचे पूजन कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी संचालक प्रा. एन. एस. चौगुले, प्रा. बापूसो भोसले-पाटील, आदींनी मनोगते व्यक्त केली.मंडलिकांना आदरांजली वाहण्यासाठी आयोजित केलेल्या शोकसभेत बंडोपंत चौगुले-म्हाकवेकर, चंद्रकांत गवळी, विश्वासराव कुराडे, नंदकुमार घोरपडे, रामचंद्र सांगले, आनंदराव फराकटे, शिवाजीराव इंगळे, बाबगोंड पाटील, दिनकर पाटील, नंदाताई सातपुते, कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस,यासह कामगार, सभासद वाहतूक कंत्राटदार व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)हमीदवाडा कारखाना दुसऱ्या दिवशीही सुन्नच!उच्चांकी दराची परंपरा कायम ठेवून तालुक्यातील शेतकऱ्यांना फार मोठा आर्थिक हातभार लावला. हजारो कामगारांच्या जीवनात ही आनंदाचे मळे फुलले. मंडलिकांची ‘एक्झिट’ येथील सहन न होणारी आहे. त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रासह तालुक्यात बुधवारी दुसऱ्या दिवशीही सन्नाटाच दिसत होता.शेतकऱ्यांचे हित हीच श्रद्धांजलीहमीदवाडा कारखान्याचे संस्थापक सदाशिवराव मंडलिक यांच्या निधनानंतर २४ तास हा कारखाना बंद ठेवण्यात आला. तीन दिवसांचा दुखवटा असला तरी बहुतांश शेतकऱ्यांचा तुटलेला ऊस शेतामध्ये शिल्लक आहे. त्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ नये यासाठी साखर कारखाना सुरू ठेवणे हीच मंडलिकांना खरी श्रद्धांजली ठरेल.
हमीदवाड्यावर मंडलिकांना आदरांजली
By admin | Updated: March 12, 2015 00:44 IST