संदीप आडनाईक -- कोल्हापूर --शिक्षणाची मुहूर्तमेढ हाच पन्हाळगडावरील सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास आहे. तीच परंपरा आजही येथे कायम आहे. पन्हाळा आणि परिसरातील मुलांना चाळीसच्या दशकात इंग्रजी शिक्षण घेणे शक्य नव्हते, तेव्हा सखाराम आपदेवबुवा तथा मामासाहेब गुळवणी यांनी पन्हाळ्यातील काही वकील व प्रतिष्ठितांना एकत्र घेऊन सध्याच्या तहसील कार्यालयासमोरील श्रीमंत बावडेकर यांच्या राम मंदिरात श्री गणेश विद्यालय या नावाने शाळेची १९३८ मध्ये स्थापना केली. पाचवी व सहावीसाठी इंग्रजी विषय तेव्हा शिकविला जाई. गणेश चतुर्थीला गणेशाची प्रतिष्ठापना करून शाळा तर सुरू झालीच, पण सोबतीला गणेशोत्सवही सुरू झाला तो आजतागायत.काही काळ ही शाळा सदू नाखरे यांच्या घरात भरत असे. नंतर १९३९ मध्ये करवीर संस्थानकडून शिक्षण खात्याच्या कार्यालयाकडून मान्यता मिळाल्यानंतर ती आजच्या ताराराणीच्या राजवाड्याच्या इमारतीत भरू लागली. नंतर गणेशाची स्थापना याच राजवाड्यात झाली आणि तेव्हापासून गणेशोत्सवही सुरू झाला. १९२८ मध्ये नरहर विठ्ठल काशीकर यांनी स्थापन केलेल्या शिक्षण संघ, पन्हाळा या संस्थेचे नंतर १९५२ मध्ये पन्हाळा एज्युकेशन सोसायटी असे नामकरणही झाले.पन्हाळा विद्यामंदिर म्हणजेच पूर्वीचे गणेश विद्यालय. येथे गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. शंकरराव देसाई, भास्करराव जरंडीकर, गोविंदराव पाध्ये, रामभाऊ कोरे, गजानन जपे, चिदंबर येडुरकर, भालजी पेंढारकर, मामासाहेब गुळवणी, ग. रा. नानिवडेकर या अध्यक्षांनी गणेशोत्सवाची ही परंपरा आजपर्यंत कायम ठेवली.१९६८ पासून श्री दत्त मंडळाचा गणेशोत्सवपन्हाळा येथील श्री दत्त तरुण मंडळाचा गणेशोत्सव मात्र १९६८ पासून सार्वजनिक स्वरूपात सुरू झाला. माजी नगरसेवक राजू धडेल आणि दिलीप भोसले यांनी ते दहा वर्षांचे असताना चार आण्याचा गणपती आणून ही परंपरा सुरू केली. प्रथम भोसले यांच्या घरी, नंतर बाबूराव भोसले यांच्या घरी काही वर्षे गणपतीची प्रतिष्ठापना केल्यानंतर राजू धडेल यांच्या घरीच हा गणेशोत्सव आजअखेर साजरा केला जातो. पूर्वी यंग तरुण मंडळ हे नाव असलेल्या या मंडळाने २५ आॅक्टोबर १९८९ पासून श्री दत्त तरुण मंडळ अशी अधिकृतपणे नोंदणी केलीसध्या या मंडळाचे १२ सभासद असून इतरांकडून वर्गणी जमा न करता सभासद स्वत:च गणेशोत्सव साजरा करतात. विविध उपक्रमही या मंडळाने घेतले आहेत.बाजीप्रभू बुरूजाजवळून तबक बागेत जाताना वैशिष्ट्यपूर्ण असा वाघ दरवाजा लागतो. या दरवाजावर टोपीधारक गणपती आहे. त्यामुळे गणेश पूजनाचा इतिहास राजा भोजच्या काळापर्यंत मागे जातो.अशीही परंपरा१९७0 च्या काळात पन्हाळगडावर अनंताची पूजा पाध्ये यांच्या घरी, मंत्रपुष्पांजली काशीकर यांच्या घरी तर कोजागिरी भास्करराव जरंडीकर यांच्या घरी होत असे. यासाठी सर्व पन्हाळ्यातील नागरिकांना निमंत्रण असे. हळूहळू ही परंपरा खंडित झाल्याचे या परंपरेचे साक्षीदार अरविंद जरंडीकर यांनी सांगितले. पोलीस अधिकारी माधवराव सानप यांनी १९९६ मध्ये पन्हाळ्यातूनच ‘एक गाव-एक गणपती’ या संकल्पनेला सुरुवात केली. ती इतर जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे.
गणेशाच्या साक्षीने शिक्षणाची मुहूर्तमेढ
By admin | Updated: September 5, 2014 00:55 IST