लोकमत न्यूज नेटवर्क
गडहिंग्लज : कोरोनाच्या आपत्तीमुळेच गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प झाला. येथील आरोग्य सेवाही अधिक बळकट झाली. त्याचा लाभ अधिकाधिक लोकांना मिळावा, यासाठी रुग्णालयात २०० खाटांची सुविधा तत्काळ उपलब्ध करण्यात येईल, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविशील्ड लसीच्या वितरणप्रसंगी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यामुळे एचडीएफसी बँकेकडून गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाला मिळालेला ड्युरा सिलिंडर आणि ऑक्सिजन प्रकल्पाचे उद्घाटन ३१ जानेवारीला होईल, असेही मुश्रीफ यांनी सांगितले. प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. वैद्यकीय अधीक्षक दिलीप आंबोळे यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. स्वाती कमल यांनी आभार मानले. यावेळी नगराध्यक्षा स्वाती कोरी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील, सभापती रूपाली कांबळे, डॉ. उत्तम मदने, तहसीलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी शरद मगर, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर आदी उपस्थित होते.
-
---
फोटो ओळी - गडहिंग्लज येथे मंत्री हसन मुश्रीफ यांनी डॉ.श्याम सागर यांच्याकडे कोवीशिल्ड लस सुपूर्द केली. यावेळी विजया पांगारकर,उत्तम मदने,दिलीप आंबोळे आदी उपस्थित होते.