यावर्षी आंबेओहोळ प्रकल्पात पहिल्यांदाच पाणी साठविण्यात आले. परंतु, महिनाभरातच हा प्रकल्प पूर्णक्षमतेने भरला. त्याचप्रमाणे चित्री प्रकल्पदेखील नेहमीपेक्षा यंदा लवकर भरला. त्यामुळे हिरण्यकेशीच्या महापुराचे पाणी आणि चित्री व आंबेओहोळ विसर्गाच्या पाण्यामुळे गतवर्षीची पूररेषा ओलांडून पाणी पुढे आले. म्हणूनच यंदाच्या नुकसानीचा आकडा निश्चितच वाढण्याची शक्यता आहे.
भडगाव पुलासह गजरगाव बंधारा पाण्याखाली गेल्यामुळे गडहिंग्लज, चंदगड व आजरा या तीनही तालुक्यांचा एकमेकांशी असणारा संपर्क चार दिवस तुटला होता. गिजवणे ओढ्याचे पाणी आजरा रोडवर तर हिरण्यकेशीच्या पुराचा तुंब दुंडगेनजीकच्या मोरीवर आल्यामुळे आजरा व संकेश्वर या दोन्ही मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली होती. हिरण्यकेशीला महापूर आल्यास नदीवेस भागातील नागरी वस्तीला त्याचा फटका बसतो. परंतु, यावर्षी पहिल्यांदाच आजरा रोडवरील अर्बन बँक कॉलनी व कोड्ड कॉलनी या नव्या वसाहतींना महापुराचा फटका बसला आहे. हिरलगेपासून अरळगुंडीपर्यंत हिरण्यकेशी नदीकाठावरील ऊस, भात, सोयाबीनसह बहुतेक नगदी पिके अनेक दिवस पाण्याखाली राहणार आहेत. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनाम्यानंतर झालेल्या नुकसानीचा आकडा स्पष्ट होणार आहे.
......
दृष्टीक्षेपात महापुरचा फटका पूरबाधित गावे : २३ स्थलांतरित कुटुंबे : १७५३ स्थलांतरित लोकसंख्या : ७७३९ स्थलांतरित जनावरे : ३७४१ पडझड झालेली घरे : १८१