सांगली : नोकरीचे आमिष दाखवून अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालणारा व जिल्हाधिकाऱ्यांच्या बोगस सहीचे पत्र देणारा भामटा विजय हणमंत जाधव (वय ३४, रा. हरिमणी बिल्डींग, गावभाग, सांगली) यास आज (बुधवार) गुंडाविरोधी पथकाने बेळगाव येथे अटक केली. गेला महिनाभर तो फरारी होता. त्याच्यावर सांगली शहर, मिरज शहर, जत पोलीस ठाण्यात फसवणूक व चोरीचे गुन्हे दाखल आहेत. जाधव याने नोकरीचे आमिष दाखवून त्याने सुशिक्षित बेरोेजगारांना फसवले आहे. त्याचबरोबर तत्कालीन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांचे ‘लेटरपॅड’ तयार करुन त्यांची बोगस सही करून अनेकांना शासकीय नोकरीत नियुक्तीचेही पत्र दिले आहे. पायल बर्गे (गावभाग, सांगली), मारुती सुनक्या शिंदे (रा. अच्युतराव कुलकर्णी प्लॉट, सांगली) यांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पैसे घेतले. त्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या बोगस सहीचे नियुक्तीपत्रही दिले. जत पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याचा मोबाईलही त्याने चोरल्याचा गुन्हा दाखल आहे. बेळगाव येथे तो असल्याची माहिती गुंडाविरोधी पोलीस पथकाला मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक बाजीराव पाटील, जितेंद्र शहाणे, सुनील भिसे, श्रीपती देशपांडे, महेश आवळे यांच्या पथकाने छापा टाकून ताब्यात घेतले. उद्या त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)छापखान्याचा शोध सुरूजाधव याने ज्याठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांचे लेटरपॅड तयार केले, त्या छापखान्याचा शोध सुरु करण्यात आला आहे. राजमुद्रेचा गैरवापर केल्याप्रकरणी छापखान्यावर कारवाई होणार आहे. विजय जाधव सध्या बेळगाव येथील एका स्थानिक वृत्तवाहिनीमध्ये काम करीत होता.
अखेर फरारी भामटा विजय जाधवला अटक
By admin | Updated: March 12, 2015 00:05 IST