कोल्हापूर : टाकाळा खणीत ‘लँडफिल्ड साईट डेव्हलपिंग’ तयार करण्याचे काम पावसामुळे खोळंबले आहे. प्रशासनाने मार्चपर्यंत ही खण कचरा टाकण्यायोग्य तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. झूम प्रकल्पातील कचऱ्यावर प्राथमिक प्रक्रिया करूनच चाळण पद्धतीने राहिलेल्या कचऱ्याचे घटक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या निकषांनुसारच या खणीत टाकले जाणार आहेत. अशा प्रकारे खण भरल्यानंतर त्यावर आरक्षणाप्रमाणे बगीचा तयार करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने ‘लोकमत’ला दिली.टाकाळा येथील ११८०/क या ३.२४ आर. क्षेत्रातील खणीची जागा बगीचासाठी आरक्षित करण्यात आली आहे. याठिकाणी साडेतीन कोटी रुपये खर्चून झूम येथील कचऱ्यावर प्राथमिक प्रक्रिया करून टाकाळा खण येथे टाकण्याची योजना आखली. खणीमध्ये कचरा टाकण्यापूर्वी थेट कचरा न टाकता फक्त झूम प्रकल्पातील कचऱ्यावर प्राथमिक प्रक्रिया करून उर्वरित ‘रॉ मटेरिअल’च टाकण्याचे बंधन प्रदूषण नियंत्रण मंडळाने घातले आहे. खणीत सध्या असणारे पाणी व जलपर्णी हटविण्याचे काम महापालिकेने हाती घेतले; मात्र पावसामुळे काम संथगतीने सुरू आहे.खण स्वच्छ केल्यानंतर जमिनीवर प्रदूषण नियंत्रण कायद्याने घालून दिलेल्या निकषांनुसारच शास्त्रीय पद्धतीने कचऱ्याचे घटक बुजविले जाणार आहेत. खणीच्या तळाकडील भागात जाड प्लास्टिकचा थर अंथरला जाणार आहे. यानंतर काही थर कचरासदृश्य पदार्थ टाकून यावर माती व मुरूम टाकला जाणार आहे. अशा पद्धतीने थर तयार करीतच ही खण बुजविली जाणार असल्याचे मंडळाच्या सूत्रांनी स्पष्ट केले. टाकाळा खणीत कचरा टाकण्यास सुरुवात झाल्यानंतरच कचऱ्याच्या प्रश्नातून मुक्तीकडे शहराचे पाऊल पडणार आहे. झूममधील कचरा हटविल्यानंतर याठिकाणी कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प उभा केला जाणार आहे. मात्र, टाकाळा खण येथे कचरा टाकण्यास योग्य पद्धतीने तयार होण्यास अद्याप किमान आठ ते दहा महिन्यांचा कालावधी बाकी आहे. यामुळे मार्च २०१५नंतरच शहरातील कचरा शास्त्रीय पद्धतीने निराकरण होण्यास सुरुवात होणार आहे.टाकाळा खणीमध्ये प्रक्रीया करुन कचरा टाकावा. ज्यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागू नये. महापालिकेने या गोष्टीकडे लक्ष न दिल्यास आंदोलन करण्याचा इशाराही परिसरातील नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे कचरा टाकाळा खणीत योग्यरित्याटाकण्याचे आव्हान समोर ठाकले आहे. (प्रतिनिधी)
टाकाळा खण कचऱ्याने भरणार
By admin | Updated: August 7, 2014 00:21 IST