सरवडे : राधानगरी तालुक्यातील कासारपुतळे येथे घरगुती गणपती विसर्जन करताना गणपती पुढे नेण्याच्या कारणावरून दोन गटांत मारामारी झाली. याबाबत राधानगरी पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून, दोन्हीकडील १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावात दोन स्ट्रायकिंग फोर्स, स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त लावला असून, तणावपूर्ण शांतता आहे.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, काल, गुरुवारी सायंकाळी घरगुती गौरी-गणपतीचे विसर्जन सुरू होते. ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरासमोर सर्व गल्ल्यांतील गणपती आले असता सामुदायिक आरती झाली. त्यानंतर गणपती पुढे नेण्याच्या कारणावरून वादाची ठिणगी पडली. त्यानंतर दूधगंगा नदीकाठावर दोन्ही गटांत हाणामारी झाली.त्यानंतर कृष्णा राऊ कांबळे याने पांडुरंग श्रीपती सावंत यांच्यासह बाराजणांविरुद्ध पोलिसांत फिर्याद दिली, तर नेताजी परशराम सावंत यांनी सातजणांनी मारहाण केल्याची फिर्याद पोलिसांत दिली.रात्री उशिरापर्यंत सरवडे पोलीस चौकीसमोर दोन्ही गटांचे कार्यकर्ते जमले होते. आज, शुक्रवारी सकाळी शाहूवाडी उपविभागाचे उपअधीक्षक किसन गवळी, पोलीस निरीक्षक अनिल गाढे, तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी शांतता बैठक घेतली व शांतता राखण्याचे आवाहन केले. यावेळी सरपंच दयावती जाधव, उपसरपंच सीताराम खाडे, सदस्य व तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष आनंदराव पाटील, तलाठी विजय गुरव, पोलीस पाटील लीलावती खाडे, नामदेव कांबळे, कृष्णात कांबळे, संभाजी सावंत, बी. एस. पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
गणपती पुढे नेण्यावरून मारामारी
By admin | Updated: September 5, 2014 23:24 IST