सूचना व हरकतींनाही अत्यल्प प्रतिसाद
अतुल आंबी
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहरातील वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर २२ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२१ पर्यंत जाहीर केलेल्या वाहतूक आराखड्याचा बोजवारा उडाला आहे. हरकती व सूचनांनाही अत्यल्प प्रतिसाद मिळाला असून, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या सूचनांचे पालन झाले नाही. त्यामुळे आठवडी बाजारही रस्त्यावरच भरला.
वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी १५ दिवसांचा वाहतूक आराखडा प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणीसाठी दिला. त्यानुसार अंमलबजावणी करून त्यावर हरकती व सूचना घेण्यात येणार होत्या. परंतु अंमलबजावणीचा बोजवारा उडाल्याने हरकती व सूचनांना अत्यल्प प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल जनजागृतीही झाली नाही.
आराखड्यामध्ये नव्याने एकेरी मार्ग, सिग्नल, पार्किंग झोन, नो पार्किंग झोन यांसह शहरातील थोरात चौक, अण्णा रामगोंडा शाळा व विकली मार्केट याठिकाणी भरणाऱ्या या बाजारातील विक्रेते रस्त्यावर बसणार नाहीत, याची दक्षता घेणे. तसेच विक्रेते व ग्राहक यांची वाहने मुख्य मार्गावर वाहतुकीस अडथळा होईल, अशी लावली जाणार नाहीत, याची दक्षता घेण्याची सूचना दिली होती. परंतु कशाचीच अंमलबजावणी झाली नसल्याने विक्रेत्यांनी रस्त्यावरच गर्दी केली.
चौकट अधिकाऱ्याची जागा रिक्त
इचलकरंजी शहर वाहतूक शाखेचे प्रमुख नंदकुमार मोरे यांची बढतीवर जिल्ह्याबाहेर बदली झाल्याने त्यांची जागा सध्या रिक्त आहे. प्रभारी म्हणून गावभागचे गजेंद्र लोहार यांच्याकडे पदभार आहे. प्रमुख अधिकारी नसल्यानेही आराखड्याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष झाल्याची चर्चा आहे.
प्रतिक्रिया
वाहतूक आराखड्यासंदर्भातील प्राप्त सूचना व हरकतींवर बैठक होऊन पुढील निर्णय होणार आहे. तसेच आठवडी बाजारातील विक्रेते व शेतकरी यांना अचानकपणे हटविण्यापेक्षा त्यांना सूचना देऊन काही टप्प्यांमध्ये रस्त्यावर बसणे बंद केले जाईल. त्यासाठी नगरपालिकेचीही साथ गरजेची आहे.
गजेंद्र लोहार, शहर वाहतूक शाखा प्रभारी
फोटो ओळी
१२०३२०२१-आयसीएच-०४
इचलकरंजी-कर्नाटक मार्गावरील विकली मार्केट परिसरात रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांमुळे वाहतुकीचा नेहमीच बोजवारा उडतो.
१२०३२०२१-आयसीएच-०५
१२०३२०२१-आयसीएच-०६
थोरात चौकात मुख्य चौकासह कापड मार्केटकडे जाणाऱ्या मार्गावर दुतर्फा विक्रेते बसत असल्याने वाहतुकीला अडथळा होतो.
सर्व छाया-उत्तम पाटील