कोल्हापूर : लोककलाकारांचे कलेतील योगदान आणि त्यांच्या जीवनातील संघर्ष पाहता लोककलाकार आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी लोककलाकार संघाने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे. विधिमंडळ अधिवेशनात हा प्रस्ताव मांडा, अशीही मागणी केली.
कोल्हापूर जिल्हा लोककलाकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंत्री मुश्रीफ यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले.
कलाकाराकडून कलेसाठी वेचलेल्या आयुष्याच्या तुलनेत पदरात फारसे काही पडत नसल्याने या कलाकारांचा उत्तरार्ध फारसा बरा जात आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचे उर्वरित आयुष्य सुरक्षित जावे म्हणून आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे गरजे असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. मानधनाच्या बाबतीत देखील प्रचंड दिरंगाई होत असल्याने यातही लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
याशिवाय इतर लोककलाकारांप्रमाणे भेदिक शाहिरांना देखील पॅकेज मंजूर करून त्यांना लाभ द्यावा, अशी विनंती करण्यात आली. वयोवृद्ध कलाकार समितीवर शासन आदेशानुसार कलाकार व साहित्यिकांची शासन जीआरप्रमाणे तत्काळ नियुक्ती करावी, असाही आग्रह धरण्यात आला. या शिष्टमंडळात रामचंद्र चौगले, अनिता मगदूम यांचा समावेश होता.
मानधन वेळेत द्या
१६ हजार कलाकारांचे मानधन गेल्या तीन महिन्यांपासून थकले आहे, कलाकारांचे जीवन पाहता त्यांना ते ताबडतोब द्यावे, शिवाय दर महिन्याच्या एक तारखेलाच ते मानधन कलाकारांच्या पदरात पडेल अशी कार्यवाही करावी, असेही मुश्रीफ यांच्या कानावर घालण्यात आले. कलाकारांच्या मानधनात पाच हजारांपर्यंत वाढ करावी, असाही आग्रह धरण्यात आला.