कोल्हापूर : न्यायालयाच्या दणक्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने १५३ कर्मचाऱ्यांना कायम नेमणुकीची पत्रे दिली. मात्र, या कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेने अद्याप कामावर घेतलेले नाही. तसेच यातील मृत २७ कर्मचाऱ्यांचे वारस व ११ कर्मचाऱ्यांना नेमणूकपत्रेच मिळालेली नाहीत. त्यामुळे महापालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष रमेश देसाई यांनी महापालिका प्रशासनाला मंगळवार (दि. ९) पासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. मात्र, याबाबत दोन दिवसात बैठक घेऊन निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.महापालिका कर्मचारी संघाने ३१४ रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्या, या मागणीसाठी २८ जून २००४ रोजी कामगार न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने ३१४ कर्मचाऱ्यांना कामावर कायम करण्याचे आदेश महापालिकेला दिले. या निकालाविरोधात उच्च न्यायालयातील महापालिकेचा दावा फेटाळला गेला. कामगार न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार २००४ पासूनचा वेतन फरक देऊन निवृत्तिवेतन योजनेसह कायम आदेश द्या, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आर्थिक भार सोसणार नसल्याने आयुक्तांनी फेटाळली होती. विविध मागण्यांसाठी संपाची नोटीस दिल्याची माहिती कार्याध्यक्ष विजय वणकुद्रे यांनी दिली. (प्रतिनिधी)महापालिकेतील ६०० रोजंदारांचे काय ?३१४ रोजंदारी कर्मचाऱ्यांनी त्यासाठी कामगार न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, महापालिका प्रशासनावर विश्वास ठेवून ३५० हून अधिक रोजंदारी कर्मचारी न्यायालयात गेले नाहीत. आता या सर्वच ६५० पेक्षा अधिक रोजंदारी कर्मचाऱ्यांना प्रशासन कधी न्याय देणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे १५३ रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेत असतानाच २००० सालापूर्वी सेवेत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांना हाच न्याय लावत, कायम करण्याचा निर्णय २८ जुलै २०१४ च्या सर्वसाधारण सभेत झाला होता. सभेत या उर्वरित रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याबाबतचा विषय चर्चेसाठी आला. मात्र, आजही हा प्रश्न ‘जैसे थे’च आहे.
कर्मचाऱ्यांचा पुन्हा ‘बंद’चा इशारा
By admin | Updated: December 6, 2014 00:26 IST