पेठवडगाव : वाठार तर्फ वडगाव येथे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मोठ्या चुरशीने मतदान झाले. येथील संवेदनशील वातावरण पाहता पोलीस प्रशासनाने सकाळपासून मोठा बंदोबस्त तैनात केला होता. प्रभारी आयपीएस अधिकारी डॉ. बी. धीरजकुमार हे स्वत: सकाळपासून मतदान केंद्राबाहेर ठाण मांडून बसले होते. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार झाला नाही.
दरम्यान, दिवसभराच्या तणाव काळातदेखील धीरजकुमार यांनी तेथे उपस्थित असलेल्या लहान मुलांसोबत संवाद साधत वातावरण हलकेफुलके करण्याचा प्रयत्न केला. दुपारच्या वेळी धीरजकुमार यांनी मतदान केंद्राबाहेर उमेदवारांसोबत आलेल्या त्यांच्या समर्थकांच्या मुलांना शेजारी बोलवत त्यांच्याशी संवाद साधला. एका लहान मुलाने उत्सुकतेने तुमचा फोन आयफोन आहे का? कोणते मॉडेल आहे, यावरून सुरू झालेला संवाद, निवडणूक, राजकारण, शाळा येथेपर्यंत गेला. लहान मुलांमधील जनरल नॉलेज पाहून धीरजकुमार खूश झाले. त्या सर्वांना एका विक्रेत्याकडून अननस घेऊन दिले. त्यानंतर मुलांमधील उत्सुकता व एका अधिकाऱ्याशी संवाद साधण्याच्या धाडसामुळे प्रभावित झालेल्या धीरजकुमार यांनी सर्वांना चोकोबार आईस्क्रीम दिले. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ते पालकांसोबत येणाऱ्या लहान मुलांसोबत संवाद साधत होते.
एक नवोदित अधिकारी अशाप्रकारे संवाद साधत मुलांसोबत बसलेले पाहून मतदान केंद्राबाहेरील तणाव काहीसा निवळला होता. तसेच परिसरात नवोदित अधिकाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दिवसभर ठाण मांडून बसले होते. यावेळी मोठा बंदोबस्त तैनात होता. मतदारांमध्ये या प्रकाराची दिवसभर चर्चा होती. अनेक तरुण मतदारांनी आयपीएस अधिकाऱ्यांसोबत फोटोदेखील काढले. दरम्यान, इचलकरंजी विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनीदेखील वाठार केंद्राला भेट देऊन पाहणी केली.
फोटो ओळ : वाठार तर्फ वडगाव (ता.हातकणंगले) येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान केंद्राबाहेर लहान मुलांशी नवोदित पोलीस अधिकारी बी धीरजकुमार यांनी संवाद साधत मुलांना पार्टी दिली.