कुडाळ : शिक्षण क्षेत्रातही राजकारण्यांनी राजकारण आणले आहे. राजकारणी शिक्षण क्षेत्रापासून दूर गेल्यास या क्षेत्रामध्ये नक्कीच सुधारणा होईल, असा आशावाद एसनडीटी विद्यापीठाच्या प्राध्यापिका डॉ. नीती प्रधान यांनी कुडाळ येथील बॅ. नाथ पै संस्थेमार्फत आयोजित केलेल्या ‘उच्च शिक्षणातील गुणवत्ता’ या राष्ट्रीय परिसंवादात व्यक्त केला. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सर्व शिक्षकांनी संपूर्ण योगदान देणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कुडाळ येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्यावतीने महाविद्यालयात उच्च शिक्षणातील गुणवत्ता विषयाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील शिक्षकांनी राष्ट्रीय स्तरावरील परिसंवादाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, गोव्याचे उपविभागीय अधिकारी जी. श्रीनिवास यांनी केले. यावेळी मुंबई येथील सर्वंकष शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त प्राचार्या डॉ. सत्यवती राऊळ, एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबईचे डॉ. सुभाष वाघमारे, संस्थाध्यक्ष उमेश गाळवणकर, प्राचार्य डॉ. श्रीकांत सावंत, प्राध्यापक अल्ताफ खान, डॉ. सिध्दार्थ खाटविसावे, प्राचार्य फ्रान्सिस डिसोजा, प्राचार्य डॉ. दीपाली काजरेकर, प्राध्यापक जयवंती सावंत, अमृता गाळवणकर आदी उपस्थित होते. डॉ. प्रधान म्हणाल्या, गरजेनुसार अभ्यासक्रमात वारंवार बदल झाले पाहिजेत. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांविषयी आदर आणि धाकही असावा. खासगी शिक्षण संस्थांमध्ये बऱ्याचवेळा गोंधळाचा कारभार सुरू असतो. परंतु खासगी शिक्षण संस्थांशिवाय सरकारकडे अन्य पर्यायही उपलब्ध नाही, असे सांगितले. डॉ. श्रीनिवासन यांनी, वाढत्या लोकसंख्येमुळे सर्वसामान्यांना शैक्षणिक सोयीसुविधांपासून वंचित रहावे लागत असून याला सध्याची शिक्षणपध्दती जबाबदार आहे, असे सांगितले. परदेशात शिक्षण घेणाऱ्या मुलांना जेवढा खर्च येतो, त्या खर्चात देशात सुसज्ज अशी सातं आयटी महाविद्यालये निर्माण होऊ शकतील, अशी टीका सध्याच्या शिक्षणपध्दतीवर त्यांनी केली. यावेळी उमेश गाळवणकर, डॉ. वाघमारे आदींनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)युवा पिढी पळतेय पैशामागेसध्याची युवा पिढी पैसे कमवायच्या मागे असून यासाठी चुकीच्या मार्गांचा अवलंब करीत आहे. कष्टाने पैसे मिळतात. त्यामुळे लोभाने पैसे मिळविण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन डॉ. प्रधान यांनी यावेळी केले.याला शिक्षकच जबाबदारसमाजाच्या सद्यस्थितीला सध्याच्या शिक्षणपध्दतीबरोबरच काही प्रमाणात शिक्षकही जबाबदार आहेत. नोकरी मिळण्याच्या अगोदर आपल्याला पगार किती मिळणार, याची कल्पना असूनही अवास्तव कारणांसाठी शिक्षक संपावर जातात, हे योग्य की अयोग्य ते त्यांनीच ठरवावे, असे डॉ. प्रधान यांनी सांगितले.
राजकारणासाठी शिक्षण क्षेत्रही सोडले नाही
By admin | Updated: August 25, 2014 22:54 IST