कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्यावतीने देण्यात येणाऱ्या ‘आदर्श’ पुरस्कारांमधील राजकीय हस्तक्षेपामुळे त्यांच्या दर्जासमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आदर्श शिक्षक पुरस्काराबरोबर कर्मचारी व सदस्यांना राजर्षी शाहूंच्या नावाने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे निकष बदलून निवड केली तरच या पुरस्कारांची उंची वाढू शकते. जिल्हा परिषदेच्यावतीने प्रत्येक वर्षी शाहू जयंतीपूर्वी सदस्य व कर्मचाऱ्यांना ‘शाहू पुरस्कार’ व शिक्षक दिनानिमित्त ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार दिले जातात. जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा गौरव व्हावा, हा त्यामागील हेतू असतो. त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्यही आपल्या मतदारसंघातील विविध कामांसाठी सातत्याने पाठपुरावा करतो, विविध योजनांतून निधी खेचून आणून मतदारसंघाचे रूपडे पालटतो. अशा सदस्यांना ‘राजर्षी शाहू’ पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येते. वर्षभरात शाळेत राबविलेले नावीन्यपूर्ण उपक्रम, वर्गाची गुणवत्ता पाहून हे पुरस्कार दिले जातात. सुरुवातीच्या काळात या निकषांचे तंतोतंत पालन व्हायचे; त्यामुळे पुरस्काराला एक वेगळीच उंची असायची. हस्तक्षेपाला कंटाळून शिक्षण सभापती महेश पाटील यांनी ‘पुणे पॅटर्न’चा आग्रह धरला होता. या पॅटर्नप्रमाणे शिक्षकांची निवड झाली तर या प्रवृत्तीला थोडासा चाप लागला असता; पण या पॅटर्नचा विचार होण्याआधीच तो बासनात गुंडाळून ठेवण्याचा उद्योग काही कारभारी सदस्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
राजकीय हस्तक्षेपामुळे पुरस्कारांची उंची खालावली
By admin | Updated: September 6, 2014 00:41 IST