नाशिक : प्रचंड चुरशीच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाशी काडीमोड घेऊन स्वबळावर निवडणुकीला सामोरे गेलेल्या शिवसेनेला ही विधानसभा निवडणूक संमिश्र ठरली असून, त्या तुलनेत भाजपाचे कमळ एकावरून चारवर गेल्याचे दिसून आले. मात्र सेनेची संख्या चारवरून चारच राहिल्याने ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वाने ही निवडणूक गेल्याचे दिसून आले. शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांचे राज्यात शिवसेनाच नंबर एकला राहण्याच्या अभिवचनाला जिल्ह्यातील शिवसैनिकांबरोबरच मतदारही जागल्याचेच यानिमित्ताने पुढे आले आहे. राज्यभरात सभांची हाफ सेंच्युरी पूर्ण करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यात एक- दोन नव्हे, तर चक्क तीन-तीन सभा घेतल्या. त्यात मनमाड, येवला व नाशिकच्या सभेचा चांगलाच परिणाम देवळाली, सिन्नर, मालेगाव बाह्य आणि निफाड मतदारसंघाला झाल्याचे निकालावरून दिसून येते.येवल्यात तर पालकमंत्र्यांसारखा मातब्बर आणि कसलेला राजकारणी असूनही तुलनेने नवख्या असलेल्या संभाजी पवार यांनी बऱ्यापैकी लढत दिली. इगतपुरी मतदारसंघात शिवसेनेचे तसे पाहिले तर प्राबल्य नसले, तरी राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसमधीलच काही बंडखोर आणि एकवटलेला निष्ठावान शिवसैनिक यांच्यामुळे इगतपुरीतून शिवराम झोले निवडून येण्याची शक्यता होती; मात्र आदिवासी मतदारांनी पुन्हा पंजालाच हात दिला. त्यामानाने सिन्नर विधानसभेची निवडणूक जनतेनेच हाती घेतल्याने डोंगराएवढी विकासकामे करूनही माणिकराव कोकाटेंनी आमदारकी तोंडाळ वाणीने घालविली अन् त्याला काही अंशी वंजारी समाजाची प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष जोड लाभल्यानेच शिवसेनेचे राजाभाऊ वाजे हे माणिकरावांना हरवू शकले, असे शिवसैनिकांचे म्हणणे आहे. नाशिक शहरात अक्षरश: गुंडगिरी आणि तडीपारीची प्रतिमा तयार झालेल्या सुहास कांदेना विधानसभेत पाठविण्याची तयारी केल्याचे बोलले जात होते; मात्र मतदारांनी पुन्हा एकदा विकासालाच पसंती दिल्याने येथील सेनेची जागा येण्याची शक्यताही मावळली, असेच म्हणावे लागेल. शिवसेनेची सर्वात खात्रीशीर जागा असलेल्या मालेगाव बाह्यमधून अपेक्षेप्रमाणे आणि काहीशी अपेक्षित आघाडी घेऊन दादा भुसे तिसऱ्यांदा विधानसभेत पोहोचले असून, कदाचित त्यांच्या रूपाने जिल्ह्याला मंत्रिपदाची संधी मिळू शकते. तीच बाब काठावर पास झालेल्या अनिल कदम यांच्या बाबतीतही होऊ शकते. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पराभूत मनोवृत्ती बाळगणाऱ्या अनिल कदम यांना शिवसैनिकांच्या आणि उद्धव ठाकरे यांच्याच सभेचे टॉनिक आणि राष्ट्रवादीची छुपी मदत मिळाल्याची चर्चा आहे. सेनेने मागील वेळेप्रमाणेच चार जागा राखण्यात यश मिळविले असले, तरी त्यांना दिंडोरीची जागा गमवावी लागली. मात्र दिंडोरीच्या बदल्यात त्यांना सिन्नरच्या जागेचा लाभ झाला. सेनेला जिल्ह्यातून किमान सहा ते सात जागांची अपेक्षा होती; मात्र त्यांची निराशाच झाली. शहरात तर बबनराव घोलपांचा करिश्माच योगेश घोलप यांना तारू शकला असला, तरी बोरस्ते आणि बडगुजर कंपनी सपेशल अपयशी ठरली. शहरात काही मावळ्यांनीच फंदफितुरी केल्याची चर्चा आहे.