अतुल आंबी
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : मोठी हद्द, भौगोलिक परिस्थिती आणि वाढत्या गुन्हेगारीमुळे शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर नेहमीच कामाचा ताण असतो. त्यातच कर्मचाऱ्यांमधील अंतर्गत गटबाजीमुळे नेहमीच धुसफूस सुरू असते. त्यातून सध्या कार्यरत असलेल्या काही जणांनी बदलीसाठी विनंती अर्ज केला आहे. तसेच वेगवेगळ्या ठिकाणांहून येणाऱ्या इच्छुकांचीही नापसंती दिसत आहे. त्यामुळे या पोलीस ठाण्यात सुधारणा होणार कधी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालणे आवश्यक आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत कबनूर, चंदूर, रांगोळी, जंगमवाडी या गावांसह शहरातील जवाहरनगर ते पंचगंगा नदीपर्यंतचा भाग येतो. त्यातील रांगोळी व जंगमवाडी हे नदीच्या पलीकडे आहेत. महापुराच्या परिस्थितीत तेथे पोहोचणे भौगोलिकदृष्ट्या शक्य नाही. अशी मोठी व गुन्हेगारी अधिक असलेली हद्द आहे. मूळ शहरातील गावभाग वगळता हा नव्याने वसवलेला परिसर आहे. त्यामध्ये अनेक राज्यांतून लोक येऊन स्थायिक झाले आहेत.
अशा परिसरामुळे नेहमीच या पोलीस ठाण्यात कामाचा ताण अधिक असतो. त्या प्रमाणात पोलिसांची नेमणूकही आहे. परंतु हजर पोलिसांची संख्या ६० टक्केच आहे. त्यातून रजा, सुटी, आजारी व प्रतिनियुक्ती वगळल्यास उर्वरित अधिकारी व कर्मचाऱ्यांवरच हा संपूर्ण कामाचा ताण पडतो. त्यातच भरीत भर म्हणून अलीकडच्या काळात अंतर्गत गटबाजीमुळे धुसफूस सुरू झाली आहे. त्यामुळे कामाची व गुन्हेगारांचा शोध घेण्याची क्षमता असतानाही काही जण पाट्या टाकण्याचे काम करून निघून जातात, तर काही जण रात्रपाळीला पसंती देतात. प्रत्येक विभागाचे गट निर्माण झाले असून, त्यातील स्वत:ला गटप्रमुख समजणारे आपले नेतृत्व गाजवून प्रामाणिक काम करणाऱ्यांवर अन्याय करतात. या भावनेतून अनेकांनी बदलीसाठी अर्ज केले. या माहितीमुळे इतर पोलीस ठाण्यांतून या पोलीस ठाण्याकडे येण्यास कर्मचारी नापसंती दाखवितात.
चौकटी
जनसंपर्क झाला कमी
पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांचा जनसामान्यांशी संपर्क आवश्यक असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तशा सूचना दिल्या आहेत. परंतु सद्यस्थितीत या पोलीस ठाण्यात या सूचनांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले आहे.
मंजूर व रिक्त पदे
पोलीस ठाण्यात मंजूर व कंसात रिक्त पदे पोलीस निरीक्षक - १ (०), पोलीस उपनिरीक्षक - १ (रजेवर), पोलीस उपनिरीक्षक - ५ (२), सहायक पोलीस उपनिरीक्षक - ६ (३), पोलीस हवालदार - १९ (१२), अंमलदार - ६१ (१६) असे एकूण ८६ पैकी ५९ हजर आहेत. त्यातील प्रतिनियुक्तीवर चार, आठवडी सुटीवर ६, हक्क रजेवर ३, आजारी रजा ३ असे दररोज किमान पंधरा जण कमी असतात.