प्रकाश पाटील - कोपार्डे -एफआरपी न देणाऱ्या २० साखर कारखान्यांना साखर सहसंचालकांनी नोटिसी बजावल्यामुळे साखर कारखानदारांत खळबळ उडाली आहे. त्यातच राज्य सहकारी बँकेने साखरेचे दर कोसळल्याने मूल्यांकनात १०० रुपयांची घट केल्याने कारखानदारांवर दुहेरी आर्थिक संकट कोसळले आहे. किमान एफआरपी देण्यासाठी कोठून पैसा उभा करावयाचा हा यक्षप्रश्न कारखानदारांसमोर उभा ठाकला आहे.राज्यात सर्वच कारखान्यांना राज्य बँक मोठ्या प्रमाणावर पूर्वहंगामी कर्जपुरवठा करते. ज्या साखर कारखान्यांना राज्य बँकेचा पतपुरवठा नाही, असे कारखाने जिल्हा बँकेकडून कर्ज घेतात. पतपुरवठा करताना राज्य बँकेने पत धोरण राबविले आहे. प्रत्येक तिमाहीत बाजारात असणाऱ्या साखरेच्या दरावर साखर कारखान्यांना पतपुरवठा करताना प्रतिक्विंटल मूल्यांकन ठरविले जाते. त्याप्रमाणे कर्ज घेणाऱ्या कारखान्यांना उत्पादित होणाऱ्या प्रतिक्विंटल साखर पोत्यावर मूल्यांकनाच्या ८५ टक्के रक्कम बँका उचल देतात. मागील दोन-तीन महिन्यांपूर्वी साखरेचे दर २८०० ते २८५० रुपये प्रतिक्विंटल साखरेचा बाजारात दर होता. यावेळी राज्य बँकेने प्रतिक्विंटल २६३० रुपये साखरेचे मूल्यांकन ठरविले होते. याच्या ८५ टक्के म्हणजे प्रतिक्विंटल २२३५ रुपये साखर कारखान्यांच्या हातात पैसे मिळायचे. आता राज्य बँकेने यात १०० रुपये घट केली आहे. त्यामुळे आता प्रतिक्विंटल २१३५ रुपयेच कारखान्यांना मिळणार असून यातील १४०५ रुपयेच फक्त ऊस दरासाठी पैसे उपलब्ध होणार असून ७४० रुपये प्रक्रिया खर्च, टॅगिंगसाठी बँकच ठेवून घेणार असल्याने कारखानदारांपुढे आर्थिक संकट उभारले आहे. नेमक्या याच आर्थिक समस्येत असणाऱ्या कारखानदारांना एफआरपी न दिल्यामुळे कारणे दाखवा नोटिसी दिल्याने आर्थिक अडचणीत असणारे कारखानदार कायद्याच्या कचाट्यात आहेत. कारखानदारांचे शासन मदतीकडे, तर शेतकऱ्यांचे जिल्ह्यातील कारखानदारांच्या पहिल्या उचलीकडे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील साखर कारखानदार संभ्रमातजिल्ह्यातील २३ पैकी १९ कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू आहेत. आणखी दोन कारखान्यांचे गाळप हंगाम लवकरच सुरू होणार आहेत. या सर्वच कारखान्यांची एफआरपी २४५० ते २६५० पर्यंत आहेत.तर शाहू-कागल व गुरुदत्त टाकळी यांनी अनुक्रमे २५३० व २५५० जाहीर करूनही दिलेली नाही, तर बाकीच्या सर्वच कारखान्यांनी पहिल्या उचलीबद्दल शब्दही काढलेला नाही.या संभ्रमावस्थेत असणाऱ्या कारखानदारांपैकी दत्त दालमियाने २५३० रुपये एफआरपी बसत असताना २५०३ रुपये पहिली उचल २२ नोव्हेंबरपर्यंत गाळप केलेल्या उसाला दिली आहे.राज्य बँकेकडून मिळणारी रक्कम पहाता १४०५च उपलब्ध झाल्यानंतर उरलेले १२०० ते १२५० रुपये कुठून उभा करायचे याच संभ्रमात कारखानदार आहेत.
राज्य बँकेच्या साखर मूल्यांकनात घट
By admin | Updated: December 9, 2014 23:22 IST