जत : येथील दूरदर्शन परिवार पतसंस्थेतील लिपिक शकील शौकत शेख (वय ४५) व त्यांचा मुलगा फैजान शकील शेख (८, रा. केंचराया गल्ली, बंकेश्वर मंदिराजवळ, जत) यांचा अंकलगी (ता. जत) येथील विहिरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना आज (गुरुवारी) दुपारी तीनच्या दरम्यान घडली. याप्रकरणी उमदी (ता. जत) पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शकील शेख दूरदर्शन परिवार पतसंस्थेत काम करत होते. संस्थेला सलग दोन दिवस सुट्टी असल्यामुळे ते सहकुटुंब अंकलगी (ता. जत) येथील त्यांची मावशी खलिमबी मौला हळ्ळी यांच्या घरी कंदुरीच्या कार्यक्रमासाठी आज दुपारी बारा वाजता गेले होते. अंकलगीपासून सुमारे तीन किलोमीटरवर असलेल्या हळ्ळी यांच्या शेतात दुपारी साडेतीनच्या दरम्यान सर्वजण एकत्र जेवले. त्यानंतर फैजानने विहिरीत पोहण्याचा हट्ट धरला. त्यामुळे शकील शेख यांनी जवळच्या शेतातील विहिरीजवळ त्याला नेले. दोघांनाही पोहता येत नव्हते. फैजान विहिरीच्या काठावर पोहत असताना तो पाण्यात बुडू लागला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात शकील यांनी त्याचा हात धरला असता तोल जाऊन तेही पाण्यात पडले. विहिरीत बुडून दोघांचाही मृत्यू झाला.मौला हळ्ळी यांची विहीर सुमारे पन्नास फूट खोल असून ती काठोकाठ भरली आहे. शकील व फैजान बराचवेळ परतले नाहीत, म्हणून त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांनी विहिरीजवळ जाऊन पाहिले असता त्यांना विहिरीच्या काठावर फैजानचे कपडे दिसले. संशयावरून त्यांनी विहिरीत शोध घेतला असता दोघांचेही मृतदेह मिळाले. जत रुग्णालयात शवविच्छेदन करून रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. फैजान शेख येथील एस. आर. बी. एम. हायस्कूलमध्ये तिसरीमध्ये शिकत होता. शकील शेख यांना एक मुलगा व दोन मुली आहेत. ऐन सणासुदीच्या काळात बाप-लेकाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. (वार्ताहर)नातेवाईकांची शोधाशोधमौला हळ्ळी यांची विहीर सुमारे पन्नास फूट खोल असून ती काठोकाठ भरली आहे. शकील व फैजान बराचवेळ परतले नाहीत, म्हणून त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांनी विहिरीजवळ जाऊन पाहिले. त्यांना विहिरीच्या काठावर फैजानचे कपडे दिसले. संशयावरून त्यांनी विहिरीत शोध घेतला असता दोघांचेही मृतदेह मिळाले.
विहिरीत बुडून बाप-लेकाचा मृत्यू
By admin | Updated: October 2, 2014 23:48 IST