जहाँगीर शेख.
कागल, एकीकडे राज्याचे ग्रामविकास मंत्रिपद भूषवितांना आपल्या मतदारसंघाचाही विकासात्मक कायापालट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचे काम मंत्री हसन मुश्रीफ करत असताना दुसरीकडे या निधीचा विनियोग योग्य प्रकारे करण्यात प्रशासकीय पातळीवर अनास्था दाखविली जात आसल्याचे चित्र दिसत आहे. पाणंद रस्त्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी सत्ताधारी गटातील पंचायत समिती सदस्यालाच उपोषणास बसावे लागले आहे. विजय भोसले, जयदीप पोवार, माजी सभापती विश्वासराव कुराडे हे सदस्य उपोषणाला बसले होते.
ग्रामविकास मंत्रालयाच्या वतीने पाणंद रस्ते, घर घरगोठा, रस्ते, पाणीपुरवठा योजना अशा विविध कामांच्या घोषणा झाल्या आहेत. या विकासकामांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती प्रशासनाचा महत्त्वाचा रोल आहे. कागल पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील अधिकारी याबद्दल फारसे उत्साहित नाहीत. मुळात पंचायत समितीला थेट निधी मिळणे दुरापास्त झाले होते. मंत्री मुश्रीफ यांनी पुन्हा सुरुवात केली पण बांधकाम विभागाला त्याचे काहीच वाटत नाही. एका पाणंद रस्त्यासाठी विजय भोसले यांच्यासारख्या कार्यक्षम सदस्याला उपोषणास बसावे लागते. मग इतर भानगडी किती असतील. त्याचीच चर्चा आता रंगली आहे. पंचायत समितीच्या प्रत्येक मासिक बैठकीत बांधकाम उपअभियंता चांदणे यांना धारेवर धरले जाते पण वेळ मारून नेण्याच्या पलीकडे ते काय करत नाहीत. असाच अनुभव आहे.
चौकट..
● पंचायत समितीत महाविकास आघाडी
राज्यात महाविकास आघाडी आता अस्तित्वात आली आहे. पण तीन वर्षांपूर्वी कागल पंचायत समितीत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सत्ता स्थापन केली आहे. उपोषण करणारे विजय भोसले खा. संजय मंडलिक समर्थक आहेत. उपोषण सुरू केल्यावर त्यांना तीन दिवसांत पाणंद रस्त्याच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देतो, असे आश्वासन दिले.
● रस्त्यांच्या दर्जाबद्दलही प्रश्नचिन्ह..?
रस्त्यांच्या दर्जाबद्दलही मंत्री मुश्रीफ समर्थक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. प्रशासकीय मंजुरी देणे, कामांचे मूल्यांकन करणे, बिले काढणे, अनामत रक्कम परत देणे, याबद्दल कसे व्यवहार केले जातात. त्याचीही अर्थपूर्ण चर्चा पंचायत समिती वर्तुळात सुरू आहे. निधी जास्त आल्याने काहींना सुचेनासे झाले आहे, असे चित्र आहे.