कोल्हापूर : जलस्वराज्य योजनेंतर्गत सातवे (ता. पन्हाळा) येथील नळ पाणीपुरवठा योजनेतील गैरव्यवहाराची नेमकेपणाने माहिती घेण्यासाठी मंगळवारपासून सहाजणांच्या खास पथकाकडून चौकशी सुरू आहे. आराखड्यानुसार काम झाले किंवा नाही, याच्या माहितीसाठी योजनेच्या प्रत्येक टप्प्याची अतिशय सविस्तर माहिती घेऊन अहवाल पुढील कारवाईसाठी पोलिसांना दिला जाणार आहे. या चौकशीमुळे योजनेत ‘ढपला’ पाडलेल्यांमध्ये खळबळ उडाली आहे.जानेवारी महिन्यात ‘लोकमत’ने या गैरव्यवहारावर वृत्तमालिकेद्वारे प्रकाशझोत टाकून खाबुगिरी चव्हाट्यावर आणली होती. त्याचीही दखल प्रशासनाने घेतली आहे. जागतिक बँकेच्या अर्थसहायाने सातवे गावासाठी सन २००६-०७ मध्ये जलस्वराज्य योजनेतून एक कोटी ११ लाख रुपये मंजूर झाले. ग्रामपंचायत व ग्रामीण पाणीपुरवठा, महिला सबलीकरण, सामाजिक लेखापरीक्षण या समितीतर्फे योजनेची अंमलबजावणी झाली. दहा टक्के लोकवर्गणीही संकलित करण्यात आली. कामाचा ठेका कऱ्हाडचे रामचंद्र पोवार यांनी घेतला. ठेका घेतल्यानंतर दोन महिन्यांनी रामचंद्र यांचा मृत्यू झाला. त्यानंतर ठेकेदारी कारभाऱ्यांनी सांभाळत योजना पूर्ण केली. योजनेत अनेक त्रुटी राहिल्या. उद्देश सफल झाला नाही. त्यामुळे रहिवासी उत्तम रंगराव नंदूरकर यांनी तीन वर्षांपूर्वी पहिली तक्रार केली.वेळोवळी पाठपुरावा केला. त्यामुळे ८ जानेवारीला तत्कालीन सरपंच, ग्रामसेवकांसह १२ जणांवर फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे. योजनेतील अनेक महत्त्वाची कागदपत्रे गहाळ झाल्यामुळे योजनेत किती गैरव्यवहार झाला आहे हे स्पष्ट झाले नाही. परिणामी गुन्हा दाखल झालेल्यांना अटक करण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे स्वतंत्र सहाजणांचे तपासणी पथक चौकशीसाठी नियुक्त केले आहे. पथकातील सदस्य योजनेंतर्गत टाकलेल्या पाईपचा दर्जा, किती फूट खोल जमिनीत गाडली आहे, याची माहिती मंगळवारपासून घेत आहेत. कागदपत्रे गहाळ झाल्याने गैरव्यवहार नेमका कितीचा झाला आहे याची माहिती प्रत्यक्ष पाहणी आणि तपासणी करून घ्यावी लागणार आहे. त्यासाठी सहाजणांचे पथक तयार केले आहे. गावात जाऊन दोन दिवसांपासून चौकशी करत आहेत. चौकशी पूर्ण होण्यासाठी आठ दिवस लागतील.- एन. बी. भोई, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा
पाणी योजना गैरकारभाराची तपासणी
By admin | Updated: March 12, 2015 00:15 IST