कोल्हापूर : छेडछाड करणाऱ्यांविरोधात विद्यार्थिनींनी तक्रार नोंदविण्यासाठी शहरातील महाविद्यालयांत तक्रार, सूचना पेट्या बसविल्या आहेत. मात्र ओळखपत्रांची तपासणी, काही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लक्ष आणि सीसीटीव्हींची नजर अशा स्वरूपातील महाविद्यालयांच्या दक्षतेमुळे छेडछाड करणाऱ्या प्रवृत्तींना काहीशी जरब बसल्याचे चित्र आहे. त्यामुळे संबंधित पेट्यांमध्ये तक्रारींऐवजी काही सूचनाच विद्यार्थिनींकडून होत असल्याचे दिसत आहे.विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) सूचना आणि ‘नॅक’ मूल्यांकनामुळे शहरातील सर्वच महाविद्यालयांनी तक्रार व सूचना पेट्या बसविल्या आहेत. मात्र, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये फारसे गांभीर्य नसल्याचे चित्र होते; पण छेडछाडीला कंटाळून गेल्या दोन महिन्यांपूर्वी बोंद्रेनगर-धनगरवाडा येथील युवती पल्लवी बोडेकरने केलेल्या आत्महत्येमुळे पोलिस, महाविद्यालय प्रशासन हादरले. पोलिस प्रशासनाने महाविद्यालयांना विद्यार्थिनी कक्षात, महाविद्यालयात तक्रारपेटी बसविण्याची सूचना केली. त्यानुसार ज्या महाविद्यालयांत पूर्वीची तक्रार-सूचना पेटी होती, त्यांनी त्यांची जागा बदलली. जेथे पेट्या नव्हत्या, तिथे त्या बसविण्यात आल्या. तसेच शिक्षक, पालक, शिक्षकेतर कर्मचारी व स्वयंसेवी, सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश करून तक्रार निवारण समित्यांंची स्थापना केली आहे. या समित्यांद्वारे तसेच प्राचार्य स्वत: विद्यार्थिनींना निर्र्भीडपणे तक्रार करण्याबाबत प्रबोधन करीत आहेत. ओळखपत्रांची तपासणी, सीसीटीव्हींची नजर, अशा स्वरूपातील दक्षता महाविद्यालयांकडून घेतली जात असल्याने छेडछाड करणाऱ्यांना जरब बसल्याचे दिसत आहे.पुस्तके मिळत नाहीतविद्यार्थिनींकडून तक्रारी, सूचना केल्या जात आहेत. यामध्ये विद्यार्थिनी कक्षात स्वच्छ पाणी मिळावे, ग्रंथालयात पुस्तके मिळत नाहीत, अशा स्वरूपातील तक्रारी आहेत. महाविद्यालयांतील तक्रार व सूचना पेट्या आठवड्यातून दोन वेळा उघडण्यात येतात. त्यावर अंतर्गत तक्रार निवारण समितीद्वारे कार्यवाही केली जाते. ‘व्हॉट्स अॅप’ तक्रार छेडछाडविरोधात तक्रार नोंदविण्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने महाविद्यालयांच्या आवारात ‘व्हॉट्स अॅप’वर तक्रार नोंद करण्याचे आवाहन केले आहे. यासाठीच्या ‘व्हॉट्स अॅप’ क्रमांकांचे फलक त्यांनी लावले आहेत.एखाद्या विद्यार्थिनीने धाडसाने तक्रार केल्यास तिला न्याय मिळेल, असा विश्वास महाविद्यालयाच्या प्रशासनाने निर्माण करणे आवश्यक आहे. अंतर्गत तक्रार निवारण समितीने विद्यार्थिनींचे प्रबोधन करावे.- साधना झाडबुके, संचालिका, संवेदना संस्थाआमच्या महाविद्यालयात तक्रार निवारण समिती कार्यान्वित केली आहे. या समितीसह प्राध्यापक, मी स्वत: विद्यार्थी-विद्यार्थिनींचे प्रबोधन करतो. त्यांना निर्भीडपणे तक्रार करण्यासाठी मार्गदर्शन होते.- आर. पी. लोखंडे, प्राचार्य, महावीर महाविद्यालयमहाविद्यालयात पूर्वीपासूनच तक्रार-सूचना पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. याअंतर्गत विविध स्वरूपांतील तक्रारी, सूचनांची दखल घेत आहोत. तक्रार निवारण समितीची स्थापना केली आहे. - चंद्रशेखर दोडमणी, प्रबंधक, विवेकानंद महाविद्यालयतक्रार करणाऱ्या विद्यार्थिनींच्या नावाबाबत गुप्तता राहत नाही. त्यामुळे त्रास होऊनही बहुतांश विद्यार्थिनी तक्रार नोंदवीत नाहीत. शिवाय तक्रारीनंतर ठोस कारवाई होणे आवश्यक आहे. - श्वेता परुळेकर, माजी सचिव, विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळ
महाविद्यालयांच्या दक्षतेने तक्रारीऐवजी पेटीत सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2016 01:12 IST