भीमगोंडा देसाई- कोल्हापूर -जिल्ह्यात मुलांच्या प्रमाणात मुलींचे प्रमाण करवीर तालुक्यात सर्वांत कमी आहे. डिसेंबर २०१४ अखेर एक हजार मुलांमागे ८८७ मुली असे चिंताजनक प्रमाण असून सधन, सुशिक्षित लोकच मुलींचा जन्म नाकारण्यात ‘नंबर वन’ राहिल्याचे पुढे आले आहे. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने हरियाणातील मुलींच्या घटत्या संख्येवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहे. यामुळे स्त्री-भ्रूणहत्येचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यात कोल्हापूर जिल्ह्याची ओळख ‘सधन’ म्हणून आहे. सधन जिल्हेच स्त्री-भ्रूणहत्येत आघाडीवर राहिल्याचे निदर्शनास आल्यानंतर सामाजिक संस्था, आरोग्य विभाग यांच्याद्वारे व्यापक जागृती केली जात आहे. गर्भलिंग चिकित्सा करणाऱ्या डॉक्टरांवर पोलिसांच्या मदतीने कारवाई केली जात आहे. अंगणवाडी व आरोग्यसेविका यांच्यातर्फे गर्भवती मातेवर प्रसूती होईपर्यंत अप्रत्यक्षपणे नजर ठेवली जात आहे.सध्या विविध माध्यमांतून मुलींच्या जन्माचे स्वागत होत आहे. आता नुकतेच केंद्र शासनही ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ असा उपक्रम राबवीत आहे. तरीही करवीर तालुक्यात मुलींचा टक्का वाढत नसल्याचे समोर आले आहे. या तालुक्यात शहराचा समावेश होतो. शहरात अत्याधुनिक वैद्यकीय सामग्री सहजपणे उपलब्ध आहे. सधन आणि उच्चशिक्षितांची संख्या लक्षणीय आहे. प्रशासनाची करडी नजर असली तरी ‘नकोशी’ला गर्भातच मारले जात आहे. करवीर संस्थानची स्थापना केलेल्या रणरागिणी ताराराणीच्या भूमीतच हे शरम आणणारे वास्तव समोर आले आहे.२००१ पासून ३४ मुली वाढल्याकरवीर तालुक्यात २००१ ते २०१४ अखेर फक्त३४ मुली वाढल्या आहेत. आरोग्य विभागाकडून कितीही प्रयत्न केले तरी मुलींचा टक्का वाढत नाही. याउलट डोंगराळ, खेड्यांचा भाग अधिक असलेल्या चंदगड तालुक्यात २००१ मध्ये ९२१ मुली होत्या. डिसेंबर २०१४ अखेर ९८५ अशी मुलींची संख्या झाली आहे. सप्टेंबर २०१४ मध्ये चंदगड तालुक्यात मुलग्यांपेक्षा मुलींचीसंख्या ११ ने वाढून १०११ झाली होती. अजूनही ‘मुलगाच वंशाचा दिवा’ अशी मानसिकता आहे. समाजात मान अधिक असल्यामुळे स्त्रीलाही मुलगाच हवा असे वाटते. यामुळे गर्भातच स्त्री-भ्रूणाची हत्या केली जात आहे. सहज उपलब्धता, पैसे, सुशिक्षिततेचे प्रमाण अधिक असल्यामुळे शहरात स्त्री-भ्रूण खुडण्याचे प्रमाण अधिक आहे.- तनुजा शिपूरकर, सचिव, महिला दक्षता समितीसधनता, सुशिक्षितता, सहज गर्भलिंग तपासणी सुविधा, आदी कारणांमुळे करवीर तालुक्यात मुलींची संख्या कमी आहे, हे वास्तव आहे. करवीर तालुक्यात मुलींचे प्रमाण का वाढत नाही, याचा शोध घेण्यासाठी ६०० महिलांचा सर्व्हे येत्या १५ ते २० दिवसांत केला जाणार आहे. सर्व्हेतील अहवालानंतर विशेष उपाययोजनांचा आराखडा करण्यात येईल.- डॉ. आर. एस. आडकेकर, जिल्हा आरोग्य अधिकारीदर हजार मुलांमागे मुलींची संख्या
सधन करवीरमध्येच ‘बेटी बचाओ’ला हरताळ
By admin | Updated: January 22, 2015 00:19 IST