प्रदीप शिंदे ल्ल कोल्हापूरसरकारी व खासगी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांप्रमाणे राष्ट्रीय छात्रसैनिक शिबिरातील छात्रसैनिकांना ‘बायोमेट्रिक थम्ब’ मशीनवर आपली हजेरी द्यावी लागणार आहे. त्यामुळे शिबिरातील प्रत्येक दिवसाची नोंद थेट ग्रुप हेड क्वॉर्टर्समध्ये होणार आहे. देशात राष्ट्रीय छात्रसेनेचे मोठे संघटन असून, विविध राज्यांतील कानाकोपऱ्यांतून विद्यार्थी राष्ट्रीय एकात्मता शिबिराला एकत्र येतात. या शिबिरातून छात्रसैनिकांना संस्कृतीच्या परिचयासह वक्तशीरपणा, आज्ञा पाळणे, आदी गुणांच्या शिकवणीमुळे त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होतो. शिबिरातील सहभागी छात्रसैनिकांचे ‘व्हेरिफिकेशन’ व्हावे, तसेच कोणताही गैरप्रकार होऊ नये, या उद्देशाने बायोमेट्रिक थम्ब मशीन बसविण्यात आले आहे. पूर्वी प्रत्येक छात्रसैनिकाची कागदोपत्री हजेरी घेण्यात येत होती. यावेळी एखादा छात्रसैनिक गैरहजर राहिला, शिबिरासाठी आला नाही, तर कागदोपत्री फेरबदल होऊन तो हजर आहे, असे दाखविण्याची शक्यता होती. त्यामुळे या सर्व प्रकारात पारदर्शकपणा आणण्याच्या उद्देशाने हे बायोमेट्रिक थम्ब मशीन बसविण्यात आले आहे.
छात्रसैनिकांची हजेरी बायोमेट्रिकद्वारे
By admin | Updated: July 7, 2014 00:57 IST