अब्दुललाट : शिरदवाड (ता. शिरोळ) येथील गरोदर महिलेचा वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याच्या आरोपावरून प्रक्षुब्ध जमावाने प्राथमिक आरोग्य केंद्रावर हल्ला करून कार्यालयातील साहित्याची नासधूस केली. वर्षा विकास कांबळे (वय २४, रा. शिरदवाड) असे मृत महिलेचे नाव आहे. येथील वैद्यकीय आरोग्य अधिकारी आर. एम. तराळ यांना शिरोळचे तालुका वैद्यकीय अधिकारी एम. बी. दातार यांनी सक्तीच्या रजेवर पाठविले आहे.याबाबत अधिक माहिती अशी, शिरदवाड येथील वर्षा विकास कांबळे या बाळंतपणासाठी अब्दुललाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात काल, शुक्रवारी दाखल झाल्या होत्या. त्यावेळी आरोग्यसेविका वाय. एम. खान यांनी त्यांना दाखल करून घेतले. काही वेळानंतर कांबळे यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे रात्रभर त्या तडफडत राहिल्या. रुग्णालयाचे जबाबदार डॉ. तराळ यांनी त्यांची तपासणी न करता आरोग्यसेविकांबरोबर दूरध्वनीवर फक्त चर्चाच केली. त्यानंतर वर्षा कांबळे यांना प्राथमिक केंद्रामार्फत रुग्णवाहिकेतून इचलकरंजीच्या इंदिरा गांधी रुग्णालयात हलविले. तिथेही डॉक्टरांनी त्यांना गांभीर्याने पाहिले नाही. पुढे त्यांना कोल्हापूर सीपीआर येथे हलविण्यात आले. या घडामोडींमध्ये त्यांची प्रकृती अधिकच खालावली. सीपीआरमध्ये त्यांना आॅक्सिजनवर ठेवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान कांबळे यांचा आज, शनिवारी मृत्यू झाला.कांबळे यांच्या मृत्यूस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. आर. एम. तराळ याच कारणीभूत आहेत, असे म्हणत शिरदवाडच्या नागरिकांनी आरोग्य केंद्रावर जाऊन कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली. त्याचबरोबर डॉ. तराळ यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी शिरोळ तालुका रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे अध्यक्ष जयपाल कांबळे व इतर पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व आरोग्य अधिकारी यांना केली. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य दादा सांगावे, अनिल कुरणे, संजय शिंदे, अभिजित आलासकर, जीवन कांबळे, विजय भोजे, सहायक पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, पोलीसपाटील मानसिंग भोसले उपस्थित होते. (वार्ताहर)
जमावाचा आरोग्य केंद्रावर हल्ला
By admin | Updated: September 7, 2014 00:54 IST