कोल्हापूर : प्रजेसह देवदेवतांवरही अन्याय, अत्याचार केलेल्या आणि सत्तेने उन्मत्त झालेल्या महिषासुराशी घनघोर युद्ध करून दुर्गेने अष्टमीला त्याचा वध केला... ती दुर्गा आदिशक्ती म्हणजे करवीरनिवासिनी अंबाबाई. नवरात्रौत्सवाच्या आठव्या माळेला अंबाबाईची ‘महिषासूरमर्दिनी’ रूपात पूजा बांधण्यात आली. रात्री वाहनात विराजमान झालेल्या अंबाबाईची नगरप्रदक्षिणा काढण्यात आली. नवरात्रौत्सवात अष्टमीला अंबाबाईने महिषासुराचा वध केला; त्यामुळे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तंत्रात ‘महारात्री’ म्हणून ओळखली जाणारी ही तिथी. आजच्याच दिवशी जगदंबा आदिशक्तीने विराट रूप धारण करून महिषासुराचा वध केला. त्रिलोकाला त्रास देणारा असूर या तिथीला संपला; पण त्याहीपेक्षा ५१ शक्तिपीठांच्या यादीत करवीरसाठी ‘करवीरे महिषमर्दिनी’ असा येणारा उल्लेख सार्थ करणारी आजची ही महातिथीची पूजा म्हणजे ‘महिषासुरमर्दिनी’.ही पूजा सागर मुनीश्वर व रवी माईनकर यांनी बांधली. सर्जेराव निगवेकर, राजेंद्र निगवेकर यांनी मूर्ती सजावट केली, चित्रकार प्रशांत इंचनाळकर, इंद्रजित निगवेकर, सत्यजित निगवेकर यांनी साहाय्य केले. आज दिवसभरात श्री स्वामी समर्थ महिला भजनी मंडळ, स्वात्मानंद भजनी मंडळ (पुणे), हरिप्रिया सोंगी भजनी मंडळ, उत्तरेश्वर प्रासादिक महादेव भजनी मंडळ, शुभांगी जोशी (पुणे) यांची गायनसेवा व ‘कोणार्क’निर्मित स्वरमोहिनी कार्यक्रम सादर झाले. (प्रतिनिधी)
अष्टमीला अंबाबाई महिषासूरमर्दिनी रूपात...
By admin | Updated: October 2, 2014 23:31 IST