कोल्हापूर : दोन दिवसांपूर्वी अवैधरीत्या गॅस भरणाऱ्यावर अटकेची करवाई केली होती, त्याची जामिनावर सुटका झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याला शनिवारी पुन्हा अवैधरीत्या गॅस भरताना पोलिसांनी पकडले. वीरभद्र हिरेमठ (रा. दत्त गल्ली, शाहूनगर, राजारामपुरी) असे अटक केलेल्या युवकाचे नावे आहे.
अवैधरीत्या गॅस भरताना शाहूनगरातील दत्त गल्लीत वीरभद्र हिरेमठ याला गुुरुवारी छापा टाकून पकडले होते. कारवाईत त्याच्याकडून २७ हजार रुपयांचे गॅस सिलिंडर व साहित्य असा साठा जप्त केला होता. धोकादायकरीत्या दुसऱ्या सिलिंडरमध्ये गॅस भरून त्याची जादा दराने तो विक्री करत असल्याचे दिसून आले होते. त्याच्यावर कारवाई होऊन त्याची जामिनावर मुक्तता झाली होती, पण त्याने पुन्हा दुसऱ्याच दिवशी अवैधरीत्या गॅस भरण्याचा प्रकार सुरू केल्याचे पोलिसांना समजले, त्यानुसार राजारामपुरी पोलिसांनी शनिवारी पुन्हा छापा टाकून त्याला अटक केली. त्याच्याकडून या नव्या कारवाईत दोन सिलिंडर व इलेक्ट्रिक वजनकाटा जप्त केला.