संदीप बावचे -- जयसिंगपूर --सांगली-कोल्हापूर चौपदरीकरण रस्त्याचे काम पूर्ण झाल्याशिवाय टोल वसुली सुरू करू देणार नाही, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले असले तरी येथील टोलविरोधी सर्वपक्षीय कृती समितीचा अंकली टोल नाक्यालाच विरोध असल्याने येणाऱ्या काळात शासन व सुप्रीम कंपनी विरोधात कृती समितीचे आंदोलन पेटण्याची शक्यता आहे़ सुप्रीम कंपनीने १ मे पासून शिरोली व अंकली येथे टोल नाका उभारून टोल वसुली करण्याच्या हालचाली सुरू केल्यानंतर सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातून या टोल वसुलीला प्रखर विरोध होऊ लागला आहे़ जयसिंगपूर येथे सर्वपक्षीय कृती समितीने अंकली येथे टोल नाका उभारल्यास कोणत्याही परिस्थितीत तो उधळून लावणार, असा इशारा देऊन आंदोलनाचे हत्यार उपसले आहे़ शिरोळ तालुक्याबरोबरच इचलकरंजी, सांगलीमधून या टोलनाक्याला विरोध होत आहे़ लोकप्रतिनधींकडूनही टोलला विरोध होत असतानाच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी एस़ टी., स्कूल बसेस, छोटी चार चाकी वाहने वगळता अवजड वाहनांना टोल द्यावा लागणार आहे, असे सांगून रस्त्याचे काम पूर्ण झाल्याशिवाय टोल वसुलीला परवानगी देणार नाही, असे आश्वासन सांगली येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी दिले आहे़ शिवाय कोल्हापूर रस्त्यावर टोल सुरू राहण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. त्यामुळे टोलचे भूत मानगुटीवर बसणार आहे.चौपदरीकरणाच्या कामास झालेला विलंब, निकृष्ट काम असताना टोल वसुलीचा घाट उधळून लावण्यासाठी जयसिंगपूर येथे टोलविरोधी सर्वपक्षीय कृती समितीने आता वज्रमूठ आवळली आहे़ न्यायालयात जाणार : अवजड वाहनांची संख्या मोठीसांगली-कोल्हापूर चौपदरीकरण कामाबाबत गेल्या दोन वर्षांपासून आंदोलन अंकुश ही सामाजिक संस्था वेळोवेळी पाठपुरावा करीत आहे़ त्यातील त्रुटीदेखील संबंधित विभागाला त्यांनी निदर्शनास आणून दिल्या आहेत़ करारानुसार तमदलगे बसवान खिंड येथेच टोल नाका उभारावा, अशी मागणीदेखील केली होती़ अंकली येथे टोलनाका उभारण्याचा घाट घातला जात असल्याने याला उत्तर देण्यासाठी आंदोलन अंकुश समिती न्यायालयात जाणार आहे़
अंकली टोल नाक्यालाच विरोध
By admin | Updated: March 22, 2016 00:07 IST