कोल्हापूर : येथील शाहू मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या राजर्षी शाहू स्मारकासाठी राज्याच्या अंदाजपत्रकात तरतूद करून ठेवलेला ३.५० कोटींचा निधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महानगरपालिका प्रशासनाने यापूर्वीच शाहू स्मारकाचा १६९ कोटींचा आराखडा नगरविकास विभागाकडे सादर केला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोल्हापुरात शाहू मिलच्या जागेवर शाहू महाराजांचे भव्य असे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन या स्मारकाचा आराखडा तयार करण्यास बजावले होते. १६९ कोटींचा हा आराखडा तयार करून राज्य सरकारकडे यापूर्वीच पाठविण्यात आला आहे. काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या भूमिपूजन समारंभात त्यांना हा आराखडा प्राप्त झाल्याचेही त्यांनी सांगितले होते. तथापि, काही कागदोपत्री उणिवा दूर करायच्या राहिल्या होत्या. त्या नगरअभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी पूर्ण केल्या. १६९ कोटींच्या आराखड्यातील पहिल्या टप्प्यात ६० कोटींची कामे करायची आहेत. मुख्यमंत्री चव्हाण यांना हे काम आपल्या कारकिर्दीत सुरू व्हावे, असे वाटते. त्यामुळे राज्य सरकारने यावर्षीच्या अंदाजपत्रकात ३.५० कोटींची तरतूद करून ठेवली असून, निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी हा निधी महापालिकेकडे वर्ग केला जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
कोल्हापूर शाहू स्मारकासाठी ३.५० कोटी-मुख्यमंत्री चव्हाण यांना आपल्या कारकिर्दीत सुरू व्हावे, असे वाटते.
By admin | Updated: September 6, 2014 00:26 IST