लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पाच लाख जळगावकरांची तहान भागवणाऱ्या वाघुर धरणाचा जलसाठा ९१ टक्के झाला आहे. लवकरच शंभरी गाठणाऱ्या वाघुर धरणाचे जलपूजन महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या उपस्थितीत गुरुवारी सकाळी करण्यात आले.
वाघुर धरणावर जळगाव शहराचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने वाघुर पाणीपुरवठा योजना अंमलात आणली आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी धरणातील पाणीसाठा साठ टक्के झाला होता. परंतु आठवडाभरात झालेल्या मुसळधार पावसाने धरणाची पाणी पातळी कमालीची वाढली आहे. सध्या वाघुर धरण ९१ टक्के भरले आहे. लवकरच १०० टक्के पाणीसाठा होण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या उपस्थितीत गुरुवारी जलपूजन करण्यात आले. जलपूजनाचा मान शहरातील रहिवासी युवराज तांबे व त्यांच्या पत्नीला देण्यात आला. यावेळी साडीचोळी अर्पण करण्यात आली. नंतर महापौरांच्या हस्ते तांबे दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे माजी महानगर प्रमुख गजानन मालपुरे, ललित धांडे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना महापौर महाजन यांनी भारतीय संस्कृतीत नद्या-नाल्यातील वाहत्या पाण्याचे महत्त्व सांगत जलसाठेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. तर उपमहापौर पाटील यांनी शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या वाघुर धरणाचे प्रत्येक जळगावकरांच्या आयुष्यात अत्यंत महत्त्व असून भविष्यात धरणातील जलसाठ्याच्या आकडेवारीवरून एकदिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा मानस व्यक्त केला. धरणातील जलसाठा वाढल्याने जळगावकरांना पाण्याची समस्या भेडसावणार नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.