लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात मंगळवारपासून पावसाचे कमबॅक झाले असून, बुधवारी सकाळपासूनच जिल्ह्यातील अनेक भागात दमदार पावसाने हजेरी लावली. मंगळवारी जिल्ह्यात ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक ८०.७ मिमी पाऊस पारोळा तालुक्यात झाला असून, सर्वात कमी पाऊस २८.८ मिमी मुक्ताईनगर तालुक्यात झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात एका दिवसात झालेल्या सर्वाधिक पावसाची नोंद मंगळवारीच झाली आहे. तब्बल १५ दिवसांच्या खंडानंतर पाऊस पुन्हा सक्रिय झाल्यामुळे बळीराजा सुखावला असून, कापूस, मका व केळीला या पावसामुळे फायदा होणार आहे.
जळगाव जिल्ह्यात दरवर्षी सरासरी पर्जन्यमान ७१९.७ मिलिमीटर इतके आहे. ऑगस्ट महिन्याचे सरासरी पर्जन्यमान हे १९६.१ मिलिमीटर इतके असून, यावर्षी ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात ६७.९ मिलिमीटर म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या सरासरीच्या ३४.६ टक्के इतका पाऊस पडला आहे. ऑगस्ट महिन्याचा एकूण सरासरीपेक्षा ३० टक्के पाऊस अद्यापही कमी झालेला आहे. कमी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच कमी पावसामुळे यंदा खरीप हंगामाच्या एकूण उत्पादनात ५० टक्क्यांची घट येण्याची शक्यता आहे.