जळगाव : कमी श्रम व विना भांडवल अधिक पैसा कमविण्यासाठी शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर व ट्रॉली चोरुन त्याचा अवैध वाळू वाहतुकीसाठी वापर करणाऱ्या फैजलखान असलम खान पठाण (वय २१,रा.पिंप्राळा) व गोपाल उर्फ विशाल अशोक पाटील (वय २१,रा.खंडेराव नगर) या दोघांचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला असून ती ठिकाणच्या ट्रॉली शोधण्यात त्यांना यश आले आहे.
तालुक्यातील वडली येथून प्रदीप प्रेमराज पाटील (वय ४७) यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरची ट्रॉली (क्र.एम.एच.१९ ए.एन.६७२९) २६ मार्च रोजी रात्री चोरी झाली होती. त्यानंतर १८ एप्रिल रोजी गंगाधर मयाराम पाटील यांची ट्रॉली एकलग्न, ता.धरणगाव येथून तर मंगेश रामनारायण मालू (रा.पिंप्री, ता. धरणगाव) यांच्या मालकीची ट्रॉली ५ मे रोजी चोरी झाली होती. याप्रकरणी एमआयडीसी व धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गोपाल व फैजलखान हे दोघं जण रात्रीच्या वेळी ग्रामीण भागातून शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर व ट्रॉली चोरी करीत असल्याची माहिती मिळाल्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी सहायक फौजदार अशोक महाजन, विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अकरम शेख, सुधाकर अंभोरे, नितीन बाविस्कर, प्रीतम पाटील, राहूल पाटील, परेश महाजन, हरिष चौधरी, भारत पाटील व विजय चौधरी यांचे पथक तयार केले होते. या पथकाने ट्रॉली चोरीचे गुन्हे कुठे दाखल आहेत, त्याची माहिती घेऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर फैजलखान याला ताब्यात घेतले. त्याने कबुली दिल्यानंतर गोपाल याला ताब्यात घेतले. महसूलच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करताना पकडलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली देखील चोरीचीच निघाली. दोन ट्रॉली दोघांनी काढून दिल्या तर एक ट्रॉली तालुका पोलिसात जप्त आहे.