लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा परिषद सर्वसाधारण बदली प्रक्रियेमध्ये प्रशासकीय व विनंती बदलीने बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना जे अधिकारी कार्यमुक्त करत नसतील अशा अधिकाऱ्यांविरुद्ध प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या संघटनांच्या तक्रार निवारण सभेत करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच ही सभा झाली.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी के. बी. रणदिवे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विनोद गायकवाड, महिला व बालकल्याण अधिकारी देवेंद्र राऊत, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे आदी उपस्थित होते. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांविषयी मागासवर्गीय आरोग्य कर्मचारी संघटनेने दिलेल्या निवेदनावर यावेळी चर्चा करण्यात आली. यात कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे विभागीय अध्यक्ष अनिल सुरडकर, संघटनेचे केंद्रीय सहसचिव आर. एस. अडकमोल, जिल्हाध्यक्ष संजय ठाकूर, उपाध्यक्ष सुनील निकम, संघटनेचे जिल्हा सचिव मिलिंद लोणारी, संघटनेचे कार्याध्यक्ष महेंद्र वानखेडे उपस्थित होते. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेतनास होणारा विलंब, आश्वासित कालबद्ध पदोन्नती, नियमित पदोन्नत्या, तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नतीचे फायदे तात्काळ द्यावेत आदी विविध मागण्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली.