खडकदेवळा, ता. पाचोरा : तालुक्यातील वाघुलखेडा हे हिवरा नदीच्या काठी वसलेले गाव आहे. या गावात अचानक कोणीतरी रात्रीच्या सुमारास साडेसात ते आठच्या सुमारास एक खोटी अफवा पसरविली होती. खडकदेवळा येथील हिवरा माध्यम प्रकल्प हे फुटले आहे. त्यामुळे वाघुलखेडा गावात एकच खळबळ उडाली असून या अफवामुळे सुमारे दोनशे ग्रामस्थांनी गाव सोडून इतर ठिकाणी स्थलांतर केल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.
या अफवेमुळे काही ग्रामस्थ चक्क बाहेरगावी नातेवाईकाकडे तर काही शेत शिवारात निघून गेले आहेत. इतकेच काय लहान लहान मुले घेऊन रात्रीच्या अंधारात गाव सोडून इतर ठिकाणी जाण्यासाठी पायीच प्रवास करीत आहेत. ही घटना सरपंच अरुणा दिनकर पाटील यांना समजताच त्यांचे पती दिनकर पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य अमृत गायकवाड, ग्रामपंचायत रोजगार सेवक ज्ञानेश्वर पाटील यांनी वाघुलखेडा गावातील ग्रामस्थांना चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले. तसेच अनेक ग्रामस्थांना शेतातून घरी गावात आणण्यात आले आहे.
वीज गायब.. गावात सर्वत्रच अंधार..
पाचोरा तालुक्यातील वाघुलखेडा गावात अचानक रात्रीच्या साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास खडकदेवळा हिवरा माध्यम प्रकल्पच फुटल्याची अफवा पसरल्याने गावातील ग्रामस्थांमध्ये एकच धावपळ उडाली होती. त्यात भर म्हणून वाघुलखेडा गावात लाईटच गेली असल्याने कोण कुठे जात आहे, हे मात्र कळत नव्हते. काहींना गावातील ग्रामस्थांनी गावात परत बोलावले होते. वाघुलखेडा संपूर्ण गाव अंधारात आहे. तरी प्रशासनाने नदीकाठालगतच्या गावांचा वीजपुरवठा खंडित न ठेवता तो सुरळीत सुरू ठेवावा अशी मागणी वाघुलखेडा येथील ग्रामस्थांनी केली आहे.