जळगाव : कोरोना प्रादुभार्वामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा घरूनच होत असल्याने पालकांना शिक्षकांची भूमिका करावी लागत आहे. त्यामुळेच पालक आणि शिक्षक अशी दुहेरी भूमिका बजावत असणाऱ्या पालकांचा शहरातील ए. टी. झांबरे विद्यालयातील शिक्षकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या वेळी विद्यालयात पालक-शिक्षक संघाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष आर. एस. शिरसाठ होते. कार्यक्रमात पालक शिक्षक संघाच्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरणसुद्धा करण्यात आले. यात पठण, वक्तृत्व, सामान्यज्ञान स्पर्धा, चित्रकला, नाट्यछटा स्पर्धा, स्मरणशक्ती अशा विविध स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. प्रास्ताविक मुख्याध्यापक डी. व्ही. चौधरी यांनी केले. तसेच भावना पाटील, सुनीता पाटील, वैशाली पाटील, चैतन्या सपकाळे आदी पालक शिक्षक संघाचे सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन सी. बी. कोळी यांनी तर आभार पी. सी. लोहार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मनीषा ठोसरे, पराग राणे, इ. पी. पाचपांडे, डी. बी. चौधरी आर. एन. तडवी. चंदन खरे, अनिल शिवदे यांनी परिश्रम घेतले.