रक्ताची नाती ही या काळात दुरावली, जी परकी वाटत होती ती जवळची झाली. या काळात सर्व जगच जणू भेदरलेले होते. माणसं पहिल्यांदाच इतकी भयंकर हादरली होती. प्रारंभी कोरोनाची कमालीची भीती होती. कालांतराने कोरोनाबद्दल असलेल्या समज-गैरसमजाबद्दलचे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतन-मंथन होऊ लागले होते. शेवटी आपल्याला कोरोनासोबत जगावे लागेल की काय, जणू अशा निष्कर्षाप्रत यावे लागले. किंबहुना आपल्याला कोरोनासोबतच जगावे लागेल, अशी जणू मानसिकता होऊन गेली. म्हणून लोकांच्या मनातून कोरोनाबद्दलची बरीच भीती दूर झालेली दिसते. (असे असले तरी आपणास सर्वांना त्यासंदर्भात गांभीर्याने सतर्क राहावे लागेल.) दीड
वर्षापासून माणूस घरात राहून त्याचे दैनंदिन जीवनमान खोळंबले. त्याच्या मनाची कोंडी होऊ लागली होती. ती फोडण्यासाठी घराबाहेर पडणे आवश्यक होते.
आता हळूहळू जीवनमान व समाजमन बदलू लागले आहे. शासनानेही काही गोष्टी सैल केल्या.
त्यामुळे कोरोनानंतरची भरारी हळूहळू का असेना; पण ही भरारी सर्वच क्षेत्रात घेतली जातेय. पर्यटन, साहित्य, शिक्षण अशा विविध क्षेत्रातही आता बरीचशी निर्बंध उठवली गेली.
धार्मिक, ऐतिहासिक, निसर्ग स्थळे इत्यादी स्थळे आता शासनाच्या काही नियमांचे पालन करून हळूहळू सुरू होताना दिसत आहेत.
साहित्य क्षेत्राची भरारी चार भिंतीत राहून वाचकांची अभिरुची काहीशी मंदावली होती. चांगले पुस्तक विकत घ्यायला किंवा वाचनालयातून आणायला संधी
नव्हती. त्यामुळे वाचकांचे मन बेचैन झाले होते. दरम्यान ग्रंथालये ओस पडली होती. आता वाचकांची पावले ग्रंथाकडे वळू लागली आहेत. त्यावेळी ऑनलाइन कविसंमेलन, परिसंवाद, कथाकथन, विविध व्याख्याने, काव्यवाचन स्पर्धा, गीतगायन स्पर्धा, इत्यादी स्वरूपाचे साहित्यिक कार्यक्रम होऊ लागली. त्यातून प्रबोधनाबरोबरच मनोरंजनही होऊ लागले. ऑनलाइन साहित्यिक कार्यक्रमामुळे वाचकांच्या अभिरूचीला गती मिळाली. शिवाय काही संगीत मैफली, काही नाट्यप्रयोग,नाट्य अभिवाचन इत्यादी कार्यक्रम सुरू झालेले आहेत. कोरोना काळातील विविध क्षेत्रातील, विविध स्वरूपाची अनुभूती संवेदनशील कवी, लेखकांच्या लेखणीतून झिरपू लागली. कोरोना काळातील जीवघेण्या अनुभवांवर अनेक पुस्तके जन्माला आली. कोरोनामुळे मागील वर्षी नाशिक येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची आता मराठी रसिकांना चाहूल लागली आहे. त्यांना संमेलनाचे मनस्वी वेध लागले आहे.
- प्रा. डॉ.रमेश माने, अमळनेर.