नांदेड, ता. धरणगाव : येथील सद्यस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुमजली इमारतीची कमालीची दुर्दशा झालेली असून, ही इमारत धोकादायक स्वरूपाची झाली आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आरोग्य केंद्राचा कारभार इमारतीशेजारील चार खाटांच्या कक्षात कसाबसा सुरू आहे. जि. प. सदस्य माधुरी अत्तरदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे व प्रयत्नांमुळे सर्व सोयींनी परिपूर्ण अशा सुसज्ज आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी जवळजवळ चार कोटींच्यावर भरघोस निधी मंजूर झाला आहे.
नवीन आराखड्यानुसार ग्रामपंचायतीने नांदेड फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्याला लागून गावालगतची दोन ते तीन एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. आरोग्य केंद्राच्या कामाला प्रशासकीय मान्यतादेखील मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. गावापासून जवळच नांदेड-साळवा रस्त्याला लागून प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. गावातील दानशूर सदाशिव पाटील यांनी जमीन दान देऊन स्वखर्चाने इमारत बांधून दिली होती. ‘सदाशिवजी हॉस्पिटल’ असे या रुग्णालयाला नाव देण्यात आले होते.
हे प्राथमिक आरोग्य केंद्र होण्याआधी प्रायमरी हेल्थ युनिट होते. या इमारतीचे उद्घाटन १ मे १९७३ रोजी तत्कालीन अर्थ व वनमंत्री मधुकरराव चौधरी, जि. प. चे तत्कालीन अध्यक्ष गुलाबराव पवार यांच्या उपस्थितीत झाले होते. त्यानंतर रघुनाथ भोजू पाटील हे जि. प. सदस्य असताना त्यांच्या प्रयत्नाने या प्रायमरी हेल्थ युनिटला प्राथमिक आरोग्य केंद्राची मान्यता मिळाली होती. सद्यस्थितीत या इमारतीस ४८ वर्षे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.
‘लोकमत’मधूनदेखील वेळोवेळी सचित्र वृत्त प्रसिद्ध करून आरोग्य केंद्राच्या समस्येवर प्रकाशझोत टाकण्यात आला होता. इमारत पूर्णतः जीर्ण झालेली असल्याने जि. प. बांधकाम विभागाच्या उप-अभियंत्यांनी इमारत धोकादायक असल्याने तिचा वापर करण्यात येऊ नये, असे लेखी पत्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले असल्यामुळे दोन ते तीन वर्षांपासून आरोग्य केंद्र शेजारील चार खाटांच्या कक्षात कसेबसे सुरू आहे. या कक्षाचीदेखील पार दुर्दशा झालेली आहे. जमिनीवरील काही भागाच्या टाइल्स ठिकठिकाणी उखडलेल्या आहेत.
बाथरूम व शौचालयाची पार दुर्दशा झालेली असून, ते बंदच आहेत. अशाही स्थितीत वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील, डॉ. विनय चौधरी यांच्यासह कर्मचारीवर्ग रुग्णांना सेवा देत आहे. शासनाने आता निविदेची प्रक्रिया पूर्ण करून आरोग्य केंद्राच्या बांधकामास चालना द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.
070921\20210428_102725.jpg~070921\07jal_1_07092021_12.jpg
नांदेड आरोग्य केंद्राची जीर्ण झालेली धोकादायक इमारत -छाया -राजेंद्र रडे~जीर्ण होवून धोकादायक झालेली आरोग्य केंद्राची इमारत