फोटो
उचंदा ता. मुक्ताईनगर : दिव्यांग तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकून त्याचा खून करण्यात आल्याची घटना तालुक्यातील शेमळदे येथे बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. मुक्ताईनगर तालुक्यात तीन दिवसांतील हा दुसरा खून आहे.
किशोर जगन्नाथ पाटील ( ३०) असे या मृत दिव्यांग तरुणाचे नाव आहे. तो बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास तीनचाकी सायकलवर बसलेला होता. त्याचवेळी त्याच्या घरासमोर राहणार अल्पवयीन मुलगा तिथे आला व काही एक कारण नसताना किशोर याच्या डोक्यावर लोखंडी सळईने वार केला. रक्तबंबाळ किशोरला नातेवाईकांनी मुक्ताईनगर येथे खासगी दवाखान्यात नेले. तिथून जिल्हा रुग्णालयात नेले. तिथून खासगी दवाखान्यात दाखल केले असता गुरुवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला गुरुवारी सकाळी ६ वाजता पुरनाड चेकपोस्टजवळ ताब्यात घेतले.
डीवायएसपी विवेक लावंड,पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी ईश्वर जगन्नाथ पाटील यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे हे करत आहेत. आहेत. मृत किशोरवर गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शोकाकुल वातावरणात शेमळदे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई ,वडील व दोन भाऊ आहेत.