- लेखक- डॉ. श्रीपाल सबनीस, माजी अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
एन्ट्रो :
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एफ. पाटील हे ३ ऑगस्ट रोजी ८० व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांची सर्वस्पर्शी व सर्वव्यापी उच्च शिक्षण क्षेत्रातील कामगिरी ही राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय संदर्भाने गौरवास्पद आहे. त्यानिमित्ताने हा लेख.
- संपादक
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरून शैक्षणिक कामगिरीचा व्यक्तिगत इतिहास निर्माण करणाऱ्या ८० वर्षांच्या डॉ. एस. एफ. पाटील यांची थोरवी प्रेरणादायीच म्हणावी लागेल. आयुष्याच्या संध्याकाळी अनंताचा वेध अटळ असतो. अशाप्रसंगी समाजाने कृतज्ञतेची सद्भावना व्यक्त करणे कर्तव्य ठरते. अर्थात डॉ. पाटलांच्या जीवनाचे संचित मायादेवींच्या योगदानामुळेच अर्थपूर्ण ठरल्याची संसारी साक्ष महत्त्वाची आहे.
१५ ऑगस्ट १९९६ रोजी प्रा. एस. एफ. पाटील यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची सूत्रे हाती घेतली. पाच वर्षांच्या काळात त्यांनी खान्देशातील या विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासात मोलाची भर घातली. पहिल्यांदाच 'नॅक' प्रणित ४ स्टार्सचे यश प्रा.पाटील यांच्या कुशल व सक्षम नेतृत्वाने विद्यापीठाला प्राप्त करून दिले.
विद्यापीठाच्या विस्तीर्ण जागेत अनेक नव्या इमारती उभ्या केल्या. प्राध्यापकांच्या संशोधन कार्याला प्रेरणा दिली. गरीब-आदिवासी विद्यार्थ्यांच्या कल्याणाच्या 'एकलव्य' सारख्या योजना राबवल्या. साने गुरुजी संस्कार केंद्रामार्फत खान्देशचा परिसर प्रबोधनाने प्रभावित केला. मुरलीधर गंधे काका या स्वातंत्र्य सैनिकाची मनोभावे सेवा केली. अर्थात या योगदानात मायाताईंचा वाटा सिंहाचा आहे.
विद्यापीठ परिसरातील टेकड्यांवर १ लाख वृक्षांची लागवड केली. रोज सकाळी डॉ. पाटील हे मायाताईंसह झाडे लावण्यासाठी टेकड्या चढून जात. संपूर्ण राष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील हे उदाहरण दुर्मिळ ठरावे. माती आणि माणसाशी नाते जोडणारा कुलगुरू म्हणून डॉ. पाटील यांची ओळख खान्देशात कायम रुजली. अशी ओळख हे त्या मातीचेही भाग्य असते व कुलगुरुंचेसुद्धा!
या विद्यापीठाचा कालखंड संपल्यावर डॉ. एस. एफ. पाटील पुण्याच्या भारती विद्यापीठाचे कुलगुरू झाले. तेथेही त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला.
सेंट्रल युनिव्हर्सिटीज सिक्किम, झारखंड व हरियाणा यांच्या अकॅडेमिक कौन्सिलवर तसेच सेंट्रल युनिव्हर्सिटी, अहमदाबाद व हैद्राबाद तसेच बनारस हिंदू विद्यापीठाच्या निवड-समितीवर डॉ.पाटील यांनी राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून कार्य केले आहे. अर्थात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उच्चशिक्षण क्षेत्रातील त्यांचा अनुभव कोणालाही हेवा वाटावा असाच आहे. दोन विद्यापीठांच्या कुलगुरुपदाची यशस्वी धुरा सांभाळणारे डॉ. एस. एफ. पाटील संशोधक म्हणूनही देशात-परदेशात प्रसिद्ध झाले.
डॉ. पाटील हे मँचेस्टर विद्यापीठात १९७६-७८ मध्ये व्हिझिटिंग फॅकल्टी मेंबर होते. तेथील उच्च दर्जाच्या जागतिक संशोधनात त्यांचे योगदान सन्मानित झाल्याची नोंद आहे. त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर रिसर्च पब्लिकेशन दोनशेच्या वर आहेत. त्यांच्या संशोधनात्मक कार्याचा ठसा ११ आंतरराष्ट्रीय व ४७ राष्ट्रीय सिम्पोझियामामधून उमटला आहे. तसेच त्यांनी लिहिलेल्या रिव्यूव्हवड आर्टिकल्सनाही सर्वदूर प्रसिद्धी मिळाली आहे. एक अव्वल संशोधक म्हणून त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. डॉ. पाटील यांनी व्हिजिटिंग, फॅकल्टी या भूमिकेतून ब्रेमेन युनिव्हर्सिटी, जर्मनीला चार वेळा दौरा केला आहे.
लहानपणी अनवाणी पायांनी शाळेची वाट चालणाऱ्या पाटील यांना राज्य, राष्ट्र आणि विश्वाने डोक्यावर घेतले. डॉ. एस. एफ. पाटील यांचा मुलगा व दोन मुलींचा संसार मायाताईंच्या समर्पणातून आज सर्वार्थाने सुखी झाला. समाज व संस्कृतीत योगदान देणारा माणूस संसारातही यशस्वी होणे त्याच्या आयुष्याचे सार्थक असते. तसे भाग्य डॉ. पाटलांना मिळाले आहे. डॉ. एस. एफ. पाटील एक संवेदशील माणूस! माणुसकीचा गहिवर पेरणारा अस्सल संशोधक, ग्रामीण-शहरी, साक्षर-निरक्षर, द्वंद्वाना कवेत घेऊन प्रत्येकाची वेदना कुरवाळणारा समंजस नागरिक, शिक्षण व्यवस्थेची नस-नस जाणून नव्या पिढीला नवे भान देणारा निष्ठावंत शिक्षक, उच्चशिक्षणाच्या संरचनेतील मूल्यात्मक ध्येयवाद पुजणारा, आंतरराष्ट्रीय ख्यातीचा कुलगुरू आणि साने गुरुजींच्या भक्तीत रमणारा सात्विक. या सर्वांचा पवित्र सारांश म्हणजे एस. एफ. पाटील! ८० वर्षांच्या या तपस्वी व कार्यक्षम आत्मीय स्नेह्यासाठी हार्दिक शुभेच्छा!